लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य व उपाध्यक्ष शेख अहेमद शेख चाँद (९२) यांचे रविवारी सकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. १९६० च्या दशकात त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव म्हणून काम केले. त्यानंतर कै. विनायकराव पाटील यांच्यासोबत शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ला झोकून देऊन काम केले. त्यांच्या निधनामुळे मशिप्र मंडळाचा आधारवड कोसळला.राजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे शेख अहेमद होय. राजकीय क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केल्याने त्यांना १९६० मध्ये जिल्हा काँग्रेसचे सचिवपद देण्यात आले. मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या सचिवपदीही त्यांनी अनेक वर्षे काम केले. राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. रफिक झकेरिया यांच्यासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. नगरपालिकेत १५ वर्षे त्यांनी नगरसेवक म्हणून अनेक पदांवर काम केले. शहराच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवरही त्यांनी अनेक वर्षे काम केले. वसंतराव नाईक महाविद्यालय, मेडिकल बोर्ड, जिल्हा बँक, पीपल्स बँक, एमएसईबीमध्येही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.कै. विनायकराव पाटील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे रोपटे मराठवाड्याच्या राजधानीत लावले. हे रोपटे वटवृक्ष कसे होईल, यादृष्टीने शेख अहेमद यांनी बरेच काम केले. त्यांच्या कार्याची धडपड पाहून त्यांना संस्थेच्या उपाध्यक्षपदी नेमण्यात आले होते. आयुष्यभर माणसे जोडण्याचे काम त्यांनी केले. दिवंगत बाबूराव काळे, बाळासाहेब पवार हिरुभाऊ जगताप, लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल, भानुदासराव चव्हाण, माणिकदादा पालोदकर यांच्यासह अॅड. हिरालाल डोंगरे आदी मित्र परिवारात शेख अहेमद यांचे कार्य बहरत गेले.त्यांच्या निधनाबद्दल आ. सतीश चव्हाण यांनी दु:ख व्यक्त करून आमचे मार्गदर्शक हरपल्याचे नमूद केले. सोमवारी सकाळी ११ वाजता देवगिरी महाविद्यालयात श्रद्धांजलीचे आयोजन केले आहे.अचानक काळाने हिरावून नेलेशनिवारी रात्री आपल्या मोठ्या मुलाच्या घरी घरगुती कार्यक्रमास असल्याने ते आरेफ कॉलनीत गेले. रात्री मुलं, नातवंडांसोबत त्यांनी कार्यक्रमातही भाग घेतला. रात्री उशीर झाल्याने मोठ्या मुलाने त्यांना येथेच थांबा, अशी विनंती केली. शेख अहेमद यांनी ती मान्य करून थांबले. सकाळी ७.३० वाजता त्यांना काळाने हिरावून नेले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.दफनविधीला अलोट गर्दीशहरातील राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिवसभर शेख अहेमद यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी ४.३० वाजता त्यांचे पार्थिव जामा मशीद येथे आणण्यात आले. नमाज-ए-जनाजा नंतर चितेखाना कब्रस्तानात दफनविधी करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शेख अहेमद शेख चाँद यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:18 AM