औरंगाबाद : केंद्रीय दळणवळण खात्याने २०१५ मध्ये जाहीर केलेल्या बीड बायपास आणि जालना रोड हे दोन्ही ८०० कोटींचे प्रकल्प नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाने (एनएचएआय) रद्द केल्यानंतर आता शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज या ‘इंडस्ट्रीयल रोड’च्या कामावरही अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. या रोडबाबत दुसऱ्या टप्प्यात विचार करू, सध्या काहीही सांगू नका. असे खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी एनएचएआय, पीडब्ल्यूडीच्या बैठकीत स्पष्ट केले. ते एका कार्यक्रमासाठी शहरात आले होते. एनएचएआयचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर, अधीक्षक अभियंता एस. जी. देशपांडे आदींसह लोकप्रतिनिधी, उद्योजकांची यावेळी उपस्थिती होती.
आता नवीन काहीही करता येणार नाही. ज्या घोषणा केल्या ती कामे पूर्ण करू द्या. असे सांगून गडकरी यांनी जालना रोडला ७४ कोटींच देणार असल्याचे नमूद केले. तसेच एनएच २११ मधील औट्रम घाटाच्या कामाबाबत मार्चनंतर निर्णय घेऊ, असे ते म्हणाले. परभणी, नांदेड, पूर्णा, लातूर येथील रस्त्यांबाबत बैठकीत मागणी करण्यात आली.
डीएमआयसीअंतर्गत शेंद्रा ते बिडकीन इंडस्ट्रीयल पार्क ते वाळूज औद्योगिक वसाहत या ‘इंडस्ट्री ट्रँगल’साठी स्वतंत्र मार्ग बांधण्याचा ९०० कोटींचा प्रस्ताव नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आला होता. औरंगाबाद ते पैठणमार्गे शेवगाव या रस्त्यासह १९०० कोटी रुपयांपर्यंत (पान क वरून) जाण्याचा त्याचा अंदाज होता. त्याचा डीपीआर, भूसंपादन होण्यापूर्वीच गडकरी म्हणाले, सध्या तो रोड राहू द्या, भविष्यातील वाहतूक पाहून त्यावर निर्णय घेऊ. तसेच रिंग रोडपर्यंतच्या १३ कि़ मी. अंतरात उद्योगांना फायदा होईल. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात या रोडचे काम हाती घेऊ.
९०० कोटींचा शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित होता. त्यात औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील समायोजन होते. त्यासाठी भूसंपादनासह १ हजार कोटी लागण्याचा अंदाज होता. पैठण रस्ता सध्या ३० मीटर रुंद असून, ३० मीटर नव्याने भूसंपादन केल्यास तो रस्ता नॅशनल हायवे अॅथॉरिटीच्या निकषाप्रमाणे पूर्ण करता येईल. १९० किलोमीटरच्या कामाला १९०० कोटी रुपये भूसंपादनासह लागण्याचे अनुमान आहे. इंडस्ट्री ट्रँगलसाठी लागणारा ९०० कोटींचा खर्च डीएमआयसीच्या खात्यातून एनएचएआयकडे वर्ग होणार असल्याने दोन्ही विभागाने या रस्त्याची संयुक्त पाहणी केली होती. परंतु आता गडकरी यांनी दुसऱ्या टप्प्यात या रोडचे काम करणार असल्याचे स्पष्ट केल्यामुळे सध्या तरी त्या रोडच्या कामाला बे्रकच लागला असे म्हणावे लागेल.
रोडच्या कामासाठी केलेल्या मार्किंगचे कायशेंद्रा-बिडकीन-वाळूज या रोडसाठी मार्किंग केली आहे. आता रोडच्या कामाबाबत अनिश्चितता असल्यामुळे मार्किंगचा मुद्दा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एनएचएआयकडे भारतमालाचे दोन प्रकल्प येथे असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. त्यात शेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज आणि एनएच २११ टप्पा क्र.२ ही कामे असल्याचे अधिकाऱ्यांनी गडकरी यांना सांगितले. यातील पैठण रोडचे काम होईल.
पर्यटन, उद्योगांना दळणवळणाचा फटकाशहरात दरवर्षी देशी-विदेशी ५० लाखांच्या आसपास पर्यटक येतात. विमानतळ कनेक्टिव्हिटी वाढली आहे. परंतु अजिंठ्याच्या रोडचे काम ठप्प असल्याने पर्यटनावर परिणाम झाल्याचे सांगून उद्योजक मानसिंग पवार यांनी जालना रोडचा प्रकल्प ४०० कोटींहून ७४ कोटींवर का आला, याबाबत प्रश्न केला. तर सीएमआयएचे अध्यक्ष गिरीधर संगनेरिया यांनी औरंगाबाद ते शिर्डी या रोडच्या रुंदीकरण, दुरुस्तीची मागणी केली. जालना रोडबाबत गडकरी म्हणाले, त्या प्रकल्पाचे बजेट मोठे होते. आता विमानतळासमोर भुयारी मार्ग करण्याचा निर्णय होत आला आहे. आधी ते काम होऊ द्या, मग पुढे पाहू. अजिंठ्याच्या रोडबाबत कंत्राटदार बदलला आहे, ते कामही लवकरच सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.
पैठण रोडचे काम करावे लागेलशेंद्रा ते बिडकीनमार्गे वाळूज हा आठ पदरी मार्ग करणे प्रस्तावित होता. त्यात औरंगाबाद ते पैठण या चौपदरी मार्गाचेदेखील यात समायोजन होते. औरंगाबाद ते पैठण हा भारतमाला या कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे. त्या रस्त्याचे काम करावे लागेल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. लोकमत इन्फ्रास्ट्रक्चर कनक्लेव्हमध्ये केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी प्राधान्याने हा रस्ता भारतमाला कार्यक्रमात घेऊन त्याच्या कामाच्या सूचना करून दोन वर्षे झाले आहेत. त्या रस्त्याच्या डीपीआरचे काम ठप्प आहे.