औरंगाबाद : शेवग्याच्या शेंगा, गवार, वांगे, फुलकोबी ८० ते १२० रुपये किलोदरम्यान विकल्या जात आहेत, तर मेथीची गड्डी २५ ते ३० रुपयांना खरेदी करावी लागत आहे. हे महाग भाज्यांचे ओझे खिशाला पेलवत नसल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत.
भाज्यांचे भाव ऐकूनच डोळे पांढरे होत आहेत. यामुळे बजेट बिघडल्याने आज कोणती भाजी करायची की डाळ खिचडी खाऊन समाधान मानायचे, असा प्रश्न गृहिणींना पडला आहे. भाव विचारूनच ग्राहक भाजी न घेता निघून जात असल्याने विक्री ५० टक्के खाली घसरली आहे, असे भाजी विक्रेते सांगत आहेत. कोणत्याही भाजी मंडईत गेला तर ग्राहक कमी दिसत आहेत. रस्त्यावर बसून भाजी विकणाऱ्यांचीही हीच परिस्थिती आहे. अनेक हातगाडीवाल्यांनी दिवाळीची रांगोळी, पणत्या विकण्यास सुरुवात केली आहे.
का महागल्या भाज्या?परतीच्या मुसळधार पावसाने शेतातील भाज्यांची वाट लावली. अनेक भाज्या जागेवरच खराब झाल्या. याचा परिणाम आता भाजी मंडईत बघण्यास मिळत आहे. जाधववाडीत भाज्यांची आवक ४० टक्के घटली आहे. यामुळे भाज्यांना भाव आला आहे.
विक्रीत घटजाधववाडीत भाजीपाल्यांची आवक ४० टक्क्यांनी घटली आहे. तर दुसरीकडे महाग भाजी खरेदीकडे अनेक ग्राहकांनी पाठ फिरविली आहे.
काय खावे, हा प्रश्नखाद्यतेल महाग, डाळी महाग, भाज्या महाग, मग खावे काय, असा प्रश्न पडला आहे. दररोज सकाळ-संध्याकाळी कोणती भाजी करावी, असा प्रश्न पडत आहे. दर महिन्याला गॅसही महाग होत असल्याने घरगुती बजेट बिघडले आहे.- शुभांगी मांडे, गृहिणी
भाज्यांचे भाव २१ ऑक्टोबर (किलो)शेवग्याच्या शेंगा १०० ते १२० रु.टोमॅटो ६० ते १०० रु.वांगे ८० ते १०० रु.सिमला मिरची ९० ते १०० रु.भेंडी ६० ते ८० रु.फुलकोबी ८० ते १०० रु.गवार १०० ते १२० रु.दोडके ७० ते ८० रु.कारले ७० ते ८० रु.कोथिंबीर ३० ते ४० रु. (जुडी)पालक २० रु.