औरंगाबाद : मालमत्ता कर पाणीपट्टीची वसुली तळाला पोहोचल्याने मंगळवारी महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे मागील काही महिन्यांपासून कर मूल्यनिर्धारण विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. त्यांच्या जागेवर उपायुक्त अपर्णा थेटे यांची नेमणूक करण्यात आली.
विधि सल्लागार अपर्णा थेटे यांना अलीकडेच उपआयुक्तपदी बढती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. आता त्यांच्यावर वसुलीची जबाबदारी सोपविली आहे. करवसुली अधिक सक्षमतेने करण्यासाठी प्रभागनिहाय सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना टार्गेट ठरवून दिले आहे. यंदा मालमत्ता कर वसुलीपोटी २३४ कोटींचे, तर पाणीपट्टीच्या वसुलीपोटी ६१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर वसुलीसाठी यंत्रणेला डिसेंबरअखेरपर्यंत टार्गेट ठरवून दिले आहे. हे टार्गेट कोणत्याही स्थितीत पूर्ण करावे, अन्यथा डिसेंबरनंतर स्वतः कर वसुलीसाठी रस्त्यावर उतरेल, असेही प्रशासकांनी म्हटले आहे. नियोजनाप्रमाणे भोंबे यांच्या नियंत्रणाखाली वसुलीचे काम होत नसल्याने पदभार बदलण्याचे आदेश काढावे लागल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रभागनिहाय उद्दिष्ट
प्रभाग १- ३२ कोटी, प्रभाग २- ३५ कोटी, प्रभाग ३-२० कोटी, प्रभाग ४- ३०, प्रभाग ५- ३६, प्रभाग ६- ३६ कोटी, प्रभाग ७- ४० कोटी, प्रभाग ८- ३९ कोटी, प्रभाग ९- ४२ कोटी याप्रमाणे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे हे उद्दिष्ट साध्य होईल की नाही, याविषयी प्रशासकीय यंत्रणेलाच शंका आहे.