छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत २८०० पाईप टाकण्यात आले. त्याला वेल्डिंगने जोडणीही करण्यात आली. आता जलवाहिनी एक इंचही शिफ्ट करता येणार नाही. जलवाहिनीवर रस्ता करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. जलवाहिनीच्या विरुद्ध बाजूला नॅशनल हायवेने भूसंपादन करून रस्ता करावा, अशी भूमिका मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी बुधवारी माध्यमांसमोर मांडली.
प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, जलवाहिनी टाकण्यासाठी नॅशनल हायवेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला परवानगी दिली. ३९ किलोमीटरपैकी ३४ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्यावर नॅशनल हायवेला ‘कॅरेज वे’ (वाहतुकीचा रस्ता)चा मुद्दा कसा लक्षात आला ? अगोदर जलवाहिनीचे काम आणि त्यानंतर रस्त्याचे काम असे आदेश खंडपीठ आणि विभागीय आयुक्तांनी दिलेले असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या कामाची व दुभाजक बांधण्याची घाई केली, त्यामुळे दुभाजक तोडून जलवाहिनी टाकावी लागली. आता जलवाहिनी स्थलांतरित करणे अशक्यप्राय आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाच रस्ता स्थलांतरित करावा लागेल, त्यासाठी विरुद्ध बाजूला भूसंपादन करावे लागले तर त्यांनी करावे.
शहरासाठी पाणीपुरवठ्याची योजना महत्त्वाची आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पाणीपुरवठा योजनेच्या कामावर परिणाम होणे योग्य नाही. निर्धारित वेळेत या योजनेचे काम पूर्ण व्हावे, याला महापालिकेचे प्राधान्य आहे, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.