सिल्लोड : करवाढीच्या विरोधात भाजपने पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी दुपारी केवळ एक तास प्रतिष्ठाने बंद होती. त्यानंतर जवळपास सर्वच मार्केट पूर्णतः उघडले. यावरून भाजपचा बंद फसल्याचा आरोप बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे यांनी केला.
सिल्लोड नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून नव्याने करण्यात आलेली मालमत्ता करआकारणी जनमानसाच्या भावनांचा आदर करून करण्यात आलेली आहे. मालमत्ता कर आकारणी कायदेशीर करण्यात आली आहे. जवळपास ४-५ महिन्याच्या कालावधी उलटल्यानंतर कर आकारणीवर भाजपाच्या माध्यमातून करण्यात आलेले आंदोलन केवळ प्रसिद्धीसाठी व स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात या आंदोलनाला पाठिंबा मिळाला नाही असा दावा बाळासाहेबांची शिवसेनेने केला आहे.
दरम्यान, सिल्लोड बंदला प्रतिसाद मिळणार नाही या भितीने भाजपने आज सकाळी ७ ते ८ वाजता बंद दुकानांचे फोटोशूट करून सिल्लोड बंदला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तसेच काही व्यापाऱ्यांना दुकान उघडत असताना दमदाटी केली. मात्र, त्यानंतरही मार्केटमध्ये नियमित वेळेत दुकाने सुरू झाल्याने भाजपचे आंदोलनकर्ते पुरते तोंडघशी पडले. व्यापाऱ्यांचा या बंदला पाठिंबा नव्हता, असा दावाही बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे यांनी केले.
...तर धडा शिकवूबंद दुकानांचे फोटोशूट सुरू असताना काही व्यापारी आपले दुकान उघडत असताना भाजपच्या लोकांनी त्यांना दमदाटी करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हा निंदनियप्रकार असून बाळासाहेबांची शिवसेना हा प्रकार मुळीच खपून घेणार नाही. शांतताप्रिय सिल्लोडची संस्कृती मोडीत काढणाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा बाळासाहेबांची शिवसेना व्यापारी आघाडीचे पदाधिकारी मनोज झंवर, नरेंद्र ( बापू ) पाटील, अमृत पटेल,धैर्यशील तायडे, गौरव सहारे, आशिष कटारिया आदी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.