आज शुक्रवार ३० सप्टेंबर रोजी औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंग मंदिर येथे शिंदे गटाच्या वतीने दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा मेळावा घेण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अडीच वर्षांमध्ये जे निर्णय ठाकरे सरकारने घेतले नाही. त्यापेक्षा जास्त निर्णय आम्ही अडीच महिन्यात घेतले आहे. तसेच सदर सरकार शेतकऱ्यांचे हिताचे असल्याचेही अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.
दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने २५ हजार पेक्षा जास्त शिवसैनिक शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जाणार असल्याची माहिती अब्दुल सत्तारांनी दिली. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी देखील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. राजकारण कसं करायचं हे, चंद्रकांत खैरे यांना समजत नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
'उठावानंतर ठाकरे कुटुंबाचे आजारच पळाले'; संदीपान भुमरे मातोश्री, खैरे, दानवे साऱ्यांवरच बरसले
तत्पूर्वी, आज देखील उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यावर भाष्य केलं आहे. शिवसेना एकच आहे. शिवसेनेच्या इतिहासात एकच दसरा मेळावा होतो, तो म्हणजे शिवाजी पार्कवर, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून आज बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज व राज्यातील बंजारा समाजाच्या प्रमुख सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच शिंदे गट हे पाच लाख लोकांना बीकेसी इथे आण्याचा प्रयत्न करत आहे.
शिंदे गटाला ठाकरेंचंही टीझरनेच उत्तर-
निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, महाराष्ट्राची ताकद दिसणार या टॅगलाईनसह शिवसेनेने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत बाळासाहेबांच्या दसरा मेळाव्यातील सभेचे जुने फोटो दिसून येतात. त्यामध्ये, बाळासाहेब शिवसैनिकांना संबोधित करतानाचे छायाचित्र आहे. तसेच, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या आवाजातील उद्धव ठाकरेंचा संवाद, त्यांच्या सभांचे व्हिडिओ आणि डौलात फडकणारा भगवा ध्वज दिसून येत आहे. एकीकडे शिंदे गटाने टिझर लाँच केल्यानंतर आता ठाकरे गटानेही टिझर लाँच करत निष्ठेचा सागर उसळणार असल्याचे म्हटले आहे.