संतोष हिरेमठ, औरंगाबाद : बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटातील औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईला हलविण्यात आले आहे.
संजय शिरसाट यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णालयातील डॉक्टरांनी संजय शिरसाट यांना पुढील उपचारासाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. यानुसार, संजय शिरसाट यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला आणण्यात येत आहे.
औरंगाबाद विमानतळावर कार्यकर्त्यांची लगबग
संजय शिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सोमवारी दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी मुंबईत झालेली आहे. त्यामुळे पुढील उपचार घेण्यासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला. सिग्मा हॉस्पिटलपासून कार्डियाक ॲम्बुलन्सने थेट विमानतळाच्या आत एअर ॲम्बुलन्सने नेण्यात आले. संजय शिरसाट यांना औरंगाबाद विमानतळावर आणण्यात आले, तेव्हा कार्यकर्त्यांची मोठी लगबग पाहायला मिळाली.
दरम्यान, संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांपैकी संजय शिरसाट आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने संजय शिरसाट यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"