वैजापूर - वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना ठार मारण्यासाठी काही लोकांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका महिलेची मदत घेतली असल्याचे निनावी पत्र त्यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी प्राप्त झाले.या घटनेची माहिती वैजापूर पोलीसांना देण्यात आली असून चौकशी सुरू केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.
या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. एका अनोळखी इसमाने २८ मार्च रोजी पत्र टाईप करून आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर हे पत्र पाठवले होते.हे पत्र गुरूवारी (१३ एप्रिल) रोजी बोरनारे यांच्या कार्यालयात प्राप्त झाले. सविता महेंद्र सांळुके ( रा आळसुंदे ता कर्जत) या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या महिलेची तुम्हाला ठार मारण्यासाठी काही लोकांनी मदत घेतली असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्राचे तालुक्यात तीव्र पडसाद उमटले असून तर्कवितर्काना उधाण आले आहे. पोलीसांनी पत्राची दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे.ही धमकी कुणी दिली .हे अद्याप समजू शकले नाही.
आमदार बोरनारे आणि वाद
शिवसेना फुटल्यानंतर आमदार रमेश बोरनारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. ही घटना विधानसभा मतदार संघातील काही कार्यकर्त्यांना पटली नाही.त्यांचेवर खोक्याचा आरोप झाला.तसेच आमदारकी काळात त्यांनी मोठी माया कमावल्याचाही आरोप होत आहे.त्यांच्या कुंटुबियात देखील कलह आहे. त्यांच्या भावजयीने देखील त्यांचेवर अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. महालगाव येथे आदित्य ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचा देखील त्यांचेवर आरोप झाला आहे.त्यामुळे अनेक कारणांनी बोरनारे वादात सापडले आहेत.