हिंगोली : मागील दोन दिवसांपासून भाजपने निर्माण केलेल्या दबावाला बळी पडत शिंदेसेनेने अखेर उमेदवार बदलला आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबूराव कदम यांना उमेदवारी घोषित केली आहे.
हिंगोली विधानसभेवर दावा करणाऱ्या भाजपला आपल्याला ही जागा सोडवून घेता येत नसल्याने त्यांनी अखेर उमेदवार बदलण्यास भाग पाडले. भाजपनेच हेमंत पाटील यांच्याविरोधात प्रचार करून वातावरण दूषित केले होते. त्यामुळे पाटील यांना ही निवडणूक जड जाईल, असे भाजपच्या लोकांना वाटत होते. तर उमेदवारीवर दावा करण्यासाठी पाटील यांची प्रतिमा खराब करण्याशिवाय पर्याय नसल्याने हे सगळे घडवून आणले. मात्र, वारंवार श्रेष्ठींकडे तगादा लावूनही ही जागा शिंदेसेनेलाच सोडली जाणार असल्याचे ऐकायला मिळत होते. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांना उमेदवारीही जाहीर केली. त्यानंतर भाजपने पुन्हा गळा काढायला सुरुवात केली. उमेदवार बदला; अन्यथा आमच्यापैकी कुणाला तरीही शिंदेसेनेकडून लढवा, अशी अट घातली. मात्र, शिंदे यांनी उमेदवार बदलून भाजपचा डाव उलटवण्याचा प्रयत्न केला. यात कितपत यश येईल, हे निवडणूक झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मात्र, भाजपची मंडळी आता शिंदेसेनेच्या गळ्यात गळा घालून फिरताना दिसत आहे.
हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हेमंत पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी व या मतदारसंघातही इतर कोणी तगडा उमेदवार मिळत नसल्याने ही जागा भरून काढण्याचा प्रयत्न झाला आहे. हेमंत पाटील यांना पत्नीच्या रूपाने आणखी एकदा नव्या मतदारसंघात नशीब आजमावे लागणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास मुख्यमंत्री येणारहिंगोली लोकसभेतील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४ एप्रिल रोजी ११ वाजता हिंगोलीत हेलिकॉप्टरने दाखल होणार आहेत. येथील उमेदवारी दाखल केल्यानंतर ते यवतमाळला जाणार आहेत.
भाजपची मंडळी मंचावर अवतरलीहेमंत पाटील यांच्या उमेदवारीचे फटाके फोडण्यासाठी माजी आ. रामराव वडकुते हे निरोप न मिळाल्याने अनावधानाने हजर झाले होते. इतरांनी जाणीवपूर्वक तिकडे जाणे टाळले होते. मात्र, बाबूराव कदम यांच्यासाठी ही मंडळी न बोलावताही मंचावर हजर झाली. आढावा बैठकीत आ. तान्हाजी मुटकुळे, जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. रामराव वडकुते हजर होते. तर शिंदेसेनेचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, आ. संतोष बांगर यांचीही यावेळी उपस्थिती होती.
बाबुराव कदम कोहळीकर कोण आहेत?शिवसेनेकडून बाबुराव कदम यांना २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हदगाव हिमायत नगरमधून उमेदवारी दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत हदगाव हिमायत नगरमधून कदम उभे राहिले. कदम सध्या शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे प्रमुख आहेत.