छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभेची जागा शिवसेनेचीच आहे, आमच्याकडे पालकमंत्री संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ आणि विनोद पाटील हे तीन जण इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारीसंदर्भात उद्या निर्णय घेणार असल्याचे शिंदेसेनेचे प्रवक्ता आ. संजय शिरसाट यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
महाविकास आघाडी सोबत असलेल्या उद्धव सेनेने हिंदुत्व सोडले आहे, उबाठा म्हणजे मतासाठी लाचार झालेली जमात असल्याची खरमरी टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत शिवसेना खान हवा की बाण असा प्रचार करीत होते. यंदाच्या निवडणूकीत हा मुद्दा बाजुला पडला का, असे विचारले असता आ.शिरसाट म्हणाले की, उद्धव सेनेसाठी हिंदुत्व हा शब्द संपला आहे. बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व असे म्हणायचे. आताची उबाठा सेना मतासाठी लाचार झालेली एक जमात बनली आहे. आम्ही जातीपातीचे राजकारण करत नाही, देशविरोधी मुस्लिमांना आमचा विरोध असल्याचे ते म्हणाले.
उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार पाठवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनमध्ये चंदा लो, धंदा लो असा आरोप समाज माध्यमावर केला आहे , याकडे लक्ष वेधले असता आ. शिरसाट म्हणाले श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून गोरगरिबांना केल्या जाणाऱ्या मदतीवर आक्षेप कशासाठी. संस्थेच्या कारभाराबाबत माहिती अधिकारात धर्मादाय आयुक्ताकडून सर्व माहिती घ्यावी, काही चुकीचे घडले तर कारवाई करा,गुन्हे नोंदवा पण असे बेछुट आरोप करू नका असे. आ. शिरसाट म्हणाले.
अशा आरोप करणाऱ्यावर लोक विश्वास ठेवत नाही. खैरे यांनी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र शासनाचे याकडे लक्ष नसल्याचा आरोप केला आहे. याविषयी शिरसाट म्हणाले. खैरे यांना मुख्यमंत्र्याकडे जाण्यास लाज वाटत असेल तर त्यांनी मुख्य सचिवाकडे जावे आणि शासनाने नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी काय उपाययोजना केली याची माहिती घ्यावी असा टोला लगावला. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर मुख्य सचिवांनी नुकतीच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांची व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे बैठक घेतली आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीचमुख्यमंत्र्यांनी एक जागा राष्ट्रवादीला देण्याचे सांगितले होते, यामुळे नाशिकची जागा राष्ट्रवादीला हवी असल्याचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाल्याकडे आ. शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, महायुतीमध्ये सामजंस्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनीच घ्यायची का, असा सवाल केला. पटेल यांनी उगाच उड्या मारू नये, नाशिकची , छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेचीच आहे. ही मिळविण्यासाठी प्रतिष्ठा लागली असल्याचेही ते म्हणाले. रत्नागिरी जागेसंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील.