छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेचा बालेकिल्ला मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदेसेना-उद्धवसेना विरुद्ध एमआयएम अशी त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. शिंदेसेनेने आपली पकड असलेल्या वसाहतींमध्ये विरोधकांना कोणतीही संधी दिली नाही. मात्र, काही ठिकाणी पक्ष संघटन उभे न केल्याची खंत शिंदेसेनेला क्षणाक्षणाला जाणवत होती. बहुतांश ठिकाणी शिंदेसेनेचे काम भाजपाने केले. उद्धवसेनेच्या उमेदवारानेही आपला गढ त्वेषाने लढविला. एमआयएम उमेदवाराने मुस्लिमबहुल भागात एकहाती वर्चस्व गाजविल्याचे चित्र होते.
यंदा विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी १४ दिवसांचा अवधी मिळाला. मध्य मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या छोटा असल्याने उमेदवारांना बहुतांश वसाहतींमध्ये एक ते दोन प्रचार फेऱ्या करता आल्या. बुधवारी सकाळी सुरुवातीच्या तीन ते चार तासात मतदानासाठी कुठेही रांगा नव्हत्या. मतदारसंघातील ३२० मतदान केंद्रांवर लोकसभेसारख्या रांगा दिसून आल्या नाहीत. अत्यंत शांततेत येऊन मतदार मतदान करून निघून जात होते. महापालिका मुख्यालयातील सहा मतदान केंद्रांत फारशी गर्दी नव्हती. बुढ्ढीलेन, लोटाकारंजा, लेबर कॉलनी, सौभाग्य मंगल कार्यालय, मयूरपार्क, हर्सूल आदी भागांत दुपारपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढत नसल्याने उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची चलबिलच वाढली होती. ३ वाजेनंतर काही मतदान केंद्रांवर मतदाराच्या रांगा पाहायला मिळाल्या.
शिंदेसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या काही भागात विरोधकांना नामोहरम करून ठेवले होते. समर्थनगर, निरालाबाजार, औरंगपुरा, गुलमंडी, खाराकुंआ, शहागंज, बेगमपुरा, हर्सूल आदी ठिकाणी जैस्वाल यांनी मतदानात एकहाती सत्ता गाजवल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्धवसेनेचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनीही मयूरपार्क, भगतसिंगनगर, जाधववाडी, टीव्ही सेंटरचा काही भाग, एन-११, जटवाडा रोड, हडको कॉर्नर आदी भागात वरचष्मा सिद्ध केला. एमआयएमचे नासेर सिद्दीकी यांनी मुस्लिमबहुल भागातील सर्वच वसाहतींमध्ये वर्चस्व गाजविले.