लातूर : येथीला साई मंदिराच्या बोअरमधून सोन्यासारख्या पण सोने नसलेल्या चकाकत्या खनिजाची भगरीसारखी रेती पाण्यामध्ये येत आहे. ही रेती नेमकी कोणत्या खनिजाची आहे, याचे कोडे आहे. हे खनिज तपासणीसाठी हैदराबादच्या राष्ट्रीय भूवैज्ञानिक संशोधन आणि विकास संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. लातूरच्या विशालनगरात भव्य साईमंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात तीन बोअर घेण्यात आले आहेत. त्यातील एका बोअरमधून पाण्याबरोबर सोन्यासारखे चकाकत्या खनिजाची रेती बाहेर येते आहे. पाण्याबरोबर आलेली ही रेती पाण्याच्या तळाशी बसते. ही अनोखी रेती बघून मंदिरात जाणारे डॉ. नितीन भराटे यांच्याकडे भाविकांनी दिली. ही रेती कशाची आहे हे पाहण्यासाठी त्यांनी लातूरच्या भूजल कार्यालयात जाऊन तेथील वरिष्ठ भूजल शास्त्रज्ञ शेख यांच्याकडे गेले. त्यांनी ती रेती पाहून तिची तपासणी केली. भूजल कार्यालयाचे जाजनूरकर आणि शेख यांनी साई मंदिरात येऊन ही रेती नेमकी कशाची आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु काहीच लक्षात येत नसल्याने ती हैदराबादच्या राष्ट्रीय भूवैज्ञानिक आणि विकास संस्थेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)कशी आहे रेती ! ४सोनेरी रंगाची असून बारीक चाळलेल्या वाळूसारखी आहे. ती पाण्याच्या बाहेर काढली की लगेच सुकते. वाऱ्याच्या झुळूकीबरोबर उडून इकडे-तिकडे जाते. गरम पाण्यात टाकली असता ती फुगते आणि उष्ण केली तर त्याची पावडर होते. जाळली तर जळते त्याची सोनेरे रंग जाऊन पांढरी राख होते. तपासणीसाठी पाठविले ! ४हे रेतीसारखे खनिज काय आहे ? याची आम्हालाही उत्सुकता आहे. साई मंदिरात जाऊन आम्ही याबाबत माहिती घेतली. परंतु त्याबाबत आम्हाला काही अंदाज आला नाही. त्यामुळे तपासणीसाठी हैदराबादच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली आहे.
साई मंदिरातील बोअरच्या पाण्यात चकाकते खनिज !
By admin | Published: March 15, 2016 12:19 AM