---
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची (घाटी) विद्यार्थी संख्या १५० होती. ती ५० ने वाढून २०० झाली. दोनशे विद्यार्थी एकाच वेळी बसण्यासाठी मोठा व्याख्यान कक्ष असावा असे एमसीआयचे निकष आहे. त्यामुळे सीएसआर फंडातून ही इमारत बांधण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मनपाकडून बांधकामासह अग्नीशमनची परवानगी आणि बांधकाम विभागाकडून विद्युतीकरण, बांधकामास तांत्रिक मान्यता मिळाल्यास या इमरतीचे भूमिपूजन शिवजयंती दिनी होण्याची शक्यता आहे.
व्याख्यान कक्ष इमारत ६ कोटी ८७ लाखांच्या सीएसआर फंडातून बजाज कंपनीकडून बांधुन देण्यात येणार आहे. अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर यांनी २०१९ फेब्रवारीपासून सातत्याने या इमारतीसाठी पाठपुरवा केला. त्याला यश आल्याने ३० डिसेंबरला प्रशासकीय मान्यता मिळाली. घाटीत सध्या दिडशे विद्यार्थी बसतील असे व्याख्यान कक्ष आहेत. मात्र, २०० ते २५० विद्यार्थी एकाच वेळी बसतील असे व्याख्यान कक्षांची गरज होती. त्यासाठी लेक्चर काॅम्लेक्स थिएटरसाठी पाठपुरवा सुरु झाला. या प्रकल्पासाठी सुरुवातीपासून उपाधिष्ठाता डाॅ. भारत सोनवणे हे समन्वयाचे काम पाहत आहे. शुक्रवारी त्यांनी मनपाकडे बांधकाम व फायर एनओसीसाठी प्रस्ताव दाखल केला. तर बांधकाम विभागाकडे बांधकाम व विद्युतीकरणाच्या तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव दाखल केल्याचे अभियंता केएमआय सय्यद यांनी सांगितले. या चारही परवानगी मिळाल्या तर शिवजयंतीला भूमिपूजन करण्याचे घाटी प्रशासनानेच प्रयत्न असल्याची माहिती डाॅ. भारत सोनवणे यांनी दिली. सुरुवातीला चार मजली प्रस्तावित इमारत किंमत वाढल्याने तीन मजली करण्यात आली. मात्र, सुरुवातीच्या नियोजनाप्रमाणे ही इमारत उभारण्यासाठी अधिष्ठाता डाॅ. येळीकर यांचा प्रयत्न सुरु असल्याचेही ते म्हणाले.