औरंगाबाद: मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्यात ईडीने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर रविवारी अटकेची कारवाई केली. या कारवाईचे तीव्र पडसाद औरंगाबाद शहरात उमटत आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्यावतीने ईडी आणि केंद्र सरकार विरोधात क्रांती चौकात आज सकाळी जोरदार निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकार, हाय हाय, नरेंद्र मोदी सरकार हाय हाय, अमित शहा, हाय हाय, शिवसेना जिंदाबाद,शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, संजय राऊत आप संघर्ष करो ,हम तुम्हारे साथ है, भाजप हाय हाय, आदी घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, माजी महापौर नंदू घोडले, सचिन खैरे, बाळासाहेब थोरात, राजू वैद्य, संतोष जेजुरकर, बाबासाहेब डांगे, अनिल जैस्वाल, संतोष खेडके, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष प्रतिभा जगताप, मीरा देशपांडे, सुकन्या भोसले, माजी नगरसेविका पद्मा शिंदेसह शिवसैनिकांचा मोठ्याप्रमाणावर सहभाग आहे.
आम्ही जाब विचारूहे सगळे शिवसेनेला बदनाम करण्यासाठी आहे. ईडीने सुरात, गुवाहाटी, गोवा अशा बंडखोर आमदारांच्या प्रवासाची चौकशी करावी. भाजप केवळ शिवसेना संपविण्यासाठी हे करत आहे, अशी टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. तर हा संघर्ष सुरूच राहील, ईडीच्या धोरणाला आमचा विरोध राहील असे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे म्हटले.