आ. सरनाईक यांचा लेटरबॉम्ब : दोन्ही पक्षांतील फ्रंटवर्कर अस्वस्थ आणि अशांत
औरंगाबाद : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर पत्र देऊन त्रास टाळायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, अशी आग्रहवजा विनंती केल्यामुळे शिवेसना आणि भाजपाच्या फ्रंटवर्कर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता स्वाभिमान गहाण ठेवू नये, अशी शिवसैनिकांची भावना आहे, तर युती नैसर्गिक आहे, आमचे नेतृत्व सेनेने स्वीकारावे, असा सूर भाजपा आळवित आहे.
निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मागील २० महिन्यांपासून संघर्ष आणि खुन्नस निर्माण झाली असून आता अचानक जुळवण्याची भाषा सुरू झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया अशा
पक्षनेतृत्वाला शिकवणारे आपण कोण?
माजी नगरसेवक राजू वैद्य म्हणाले, पक्ष नेतृत्वाला शिकवणारे आपण कोण आहोत, याचा विचार करून आ. सरनाईक यांनी जाहीररीत्या पत्र देण्याऐवजी वैयक्तिक भेटून बाजू मांडणे गरजेचे होते. शिवसेनेत शिस्त आहे, मातोश्रीचा आदेश अंतिम असतो.
आता जुळवून घेण्यात अर्थ नाही
शिवसैनिक बाळासाहेब गायकवाड म्हणाले, आ. सरनाईक यांच्या प्रकरणात पक्षप्रमुखच निर्णय घेतील. परंतु भाजपाने आजवर दिलेल्या त्रासामुळे पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेण्यात काही अर्थ नाही, असे माझे वैयक्तिक मत आहे.
स्वाभिमान गहाण ठेवून कसे चालेल?
उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे म्हणाले, भाजपासोबत गेल्यावर पुन्हा फरपट होईल. शिवसैनिकांनी कुणाकुणाशी आणि किती काळ संघर्ष करायचा. शिवसेना स्वाभिमानी पक्ष असून तो गहाण ठेवून कसे चालेल.
शरणागती पत्करणे योग्य नाही
आता शरणागती पत्करणे योग्य नाही. स्वाभिमानापोटी भाजपासोबतची युती तुटली. आ. सरनाईक यांचे खासगी मत त्यांनी व्यक्त केले. त्यावर पक्ष काय तो निर्णय घेईल, असे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी म्हणाले.
---------------------------------------------------------
हिंदुत्वाचा विचार करून जुळवून घ्यावे
भाजपाचे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत थेटे म्हणाले, हिंदुत्वाचा विचार करून एकत्र यावे. जसे आ. सरनाईक यांना समजले, ते सर्व शिवसेनेच्या लक्षात आले पाहिजे.
झाले गेले विसरून जावे
हेमंत खेडकर म्हणाले, झाले गेले विसरून जावे. हिंदू मतदारांसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र यावे. सरनाईक यांच्याप्रमाणे सर्वांनीच विचार केला पाहिजे. ‘सुबह का भूला शाम को घर आये तो उसे भुला नहीं कहते.’
जुळवून घेण्यात काय अडचण
माजी नगरसेवक पंकज भारसाखळे म्हणाले, दोन्ही पक्षांना जुळवून घेण्यात काहीच अडचण नाही. ही नैसर्गिक युती असून फडणवीस यांचे नेतृत्व शिवसेनेने स्वीकारले पाहिजे. निवडणूक लढविणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी युती गरजेची आहे.
ही नैसर्गिक युती आहे
भाजपाचे संजय खंबायते म्हणाले, ही नैसर्गिक युती आहे. युतीबाबत भाजपचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. आ. सरनाईक यांची भावना सर्वांची असू शकते.