औरंगाबाद : शिवसेनेचे पश्चिम मतदारसंघाचे आ. संजय शिरसाट आणि विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यासह समर्थकांत सातारा- देवळाई परिसरातील सव्वादोन कोटी रुपयांच्या निविदेवरून झालेल्या ‘हाणामारी’ची मातोश्रीवरून दखल घेतल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा पूर्ण अहवाल वरिष्ठ पातळीवरून मागविण्यात आला असून, शिवसेना भवनातून याप्रकरणी पोलीस व संघटनात्मक पातळीवरून माहिती मागविण्यात आल्याचे शिवसेनेच्या गोटातून समजले आहे.
दरम्यान, या सगळ्या घटनेमुळे शिवसेनेत संघटनात्मक पदांवर काम करणाऱ्यांचे मनोबल खचले आहे. निवडणुकीत उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवतोड मेहनत करायची आणि निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्या उमेदवारांनी मर्जीतल्या लोकांसाठी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करायची, ही शिवसेनेतील संस्कृती नाही. त्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षातील वरिष्ठांकडे रविवारी नाराजी व्यक्त केली. रविवारी पालकमंत्री सुभाष देसाई शहरात आले. सोमवारी त्यांच्या उपस्थितीत डीपीसीची बैठक होणार आहे. तत्पूर्वी, शिवसेनेतील काही पदाधिकारी त्यांच्यासमोर गुत्तेदारीवरून हाणमारी झाल्याचे प्रकरण मांडणार आहेत. देसाई पालकमंत्री असल्याने त्यांना या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून पूर्वकल्पना देण्यात आली आहे. आ. शिरसाट, खेडकर या प्रकरणाकडे पक्ष किती गांभीर्याने लक्ष घालणार याकडे लक्ष आहे.
पोलिसांनी खेडकर यांचा जबाब घेतलाआ. शिरसाट यांच्या कार्यालयावर शनिवारी विधानसभा संघटक सुशील खेडकर व आ. शिरसाट यांच्या समर्थकांत एका टेंडरवरून हाणामारी झाली. त्या प्रकरणात खेडकर व त्यांचे सहकारी जखमी झाले असून, त्यांच्यावर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. रविवारी दुपारी खेडकर यांचा पोलिसांनी घटनेप्रकरणी जबाब नोंदवून घेतला.
नेते, आमदारांनी घेतली भेटमहापौर नंदकुमार घोडेले, माजी खा. चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, पूर्व विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, संतोष जेजूरकर आदी पदाधिकाऱ्यांनी खेडकर यांची घाटी रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आ. दानवे म्हणाले, खेडकर संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना भेटून प्रकृतीची विचारपूस केली.
केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्यात तथ्यमराठवाड्यातील लोकप्रतिनिधी कंत्राटदारांना घरी बोलवून आपली कामे आधी करा, अशी मागणी करीत असल्याचे वक्तव्य १२ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर टीका केली. मात्र, आ. शिरसाट आणि कंत्राटदार असलेले शिवसेना विधानसभा संघटक सुशील खेडकर यांच्यातील वाद गडकरींच्या वक्तव्यात तथ्य असल्याचे सांगून जात आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात मनपातही शिवसेना-भाजपममध्ये गुत्तेदार पदाधिकाऱ्यांवरून आरोप-प्रत्यारोप झाले होते.