शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेससोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजपा देखील तयार होईल, असं मत केंद्रीय मंत्री आणि रिपाइंचे प्रमुख नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद येथील बिडकीन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात बोलत होते.
भाजपा आणि शिवसेनेचा २५ वर्षांचा संसार केवळ मुख्यमंत्रिपदामुळे तुटला. मुख्यमंत्रिपदाचा शब्दच दिला नव्हता त्यामुळे ५ वर्ष की अडीज वर्ष हा विषयच नसून दिलेला शब्द मोडण्याची आमची संस्कृती नाही, असं भाजपने अनेकवेळा स्पष्टीकरण दिलेलं आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्यासोबत असते तर आम्हाला नक्कीच आनंद झाला असता, पण त्यांना आता पाच वर्षे पूर्ण मिळाले असल्याने ते आता भाजपसोबत येणार नाही, असं मत देखील रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही. राज्यात आताच्या घडीला सुरू असलेले भांडण मिटले पाहिजे, असे आम्हाला वाटते. उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
ठोस पुरावे नसताना आरोप करू नये-
ठोस पुरावे नसताना आरोप करू नये. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सुडाची भूमिका असू नये. कंगना यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते, असे रामदास आठवले म्हणाले.