शिवसेनेने दाखविला काँग्रेसला ‘हात’; औरंगाबाद जि.प. सभापती निवडणुकीत भाजपसोबत हातमिळवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:20 PM2020-01-15T12:20:12+5:302020-01-15T12:23:18+5:30
राज्यमंत्री सत्तार-अंबादास दानवे यांची खेळी यशस्वी
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मंगळवारी चार सभापतीपदांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला हरताळ फासत शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले, तर भाजपच्या अनुराधा चव्हाण यांची वर्णी महिला व बालकल्याण सभापतीपदी लागली. ऐनवेळी सभागृहात शिवसेनेने केलेल्या दगाफटक्यामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी पसारली होती. शिवसेनेने ठरवून खेळी केल्यामुळेच शिवसेनेचा महत्त्वाचा एकही पदाधिकारी जिल्हा परिषदेत आला नसल्याचीही चर्चा सुरू होती.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण, समाजकल्याण, बांधकाम व वित्त आणि शिक्षण व आरोग्य सभापती निवडीसाठी मंगळवारी (दि.१४) विशेष सभा आयोजित केली होती. यात महाविकास आघाडीमध्ये बांधकाम आणि समाजकल्याण हे दोन सभापतीपद काँग्रेसच्या वाट्याला आणि शिवसेनेकडे महिला व बालकल्याण आणि शिक्षण व आरोग्य हे दोन सभापती पद देण्यात येणार होते. हे सत्तावाटप ठरले होते. मात्र, उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी करीत तीन सभापतीपदे मिळवली आहेत. यासाठी त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली.
महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी शिवसेनेकडून मोनाली राठोड आणि भाजपकडून अनुराधा चव्हाण यांनी उमेदवारी दाखल केली होती. भाजप आणि शिवसेनेत ठरल्याप्रमाणे मोनाली राठोड यांनी माघार घेत भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिले. समाजकल्याण सभापतीपदासाठी मनसेचे विजय चव्हाण, शिवसेनेचे रमेश पवार आणि मोनाली राठोड यांनी उमेदवारी दाखल केली. यात विजय चव्हाण आणि रमेश पवार यांनी माघार घेतल्यामुळे मोनाली राठोड बिनविरोध विजयी झाल्या. बांधकाम व वित्त आणि शिक्षण व आरोग्य या विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी शिवसेनेचे अविनाश गलांडे, रमेश पवार, काँग्रेसकडून पंकज ठोंबरे, श्रीराम महाजन आणि शिवसेनेत प्रवेश केलेले राज्यमंत्री सत्तार समर्थक किशोर बलांडे यांनी उमेदवारी दाखल केली. महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या अनुराधा चव्हाण यांना बिनविरोध निवडून दिल्यामुळे अविनाश गलांडे आणि किशोर बलांडे यांना भाजपने मदत करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहात काँग्रेस अल्पमतात आली.
याचा परिणाम काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि अपक्षांनीही बलांडे आणि गलांडे यांना मतदान केले. त्यामुळे दोघांना ६० मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नीता दीपकसिंग राजपूत या मात्र तटस्थ राहिल्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण सभापती म्हणून अनुराधा चव्हाण आणि समजाकल्याण सभापती म्हणून मोनाली राठोड यांना बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. तसेच अविनाश गलांडे आणि किशोर बलांडे यांच्याकडून विषय समित्यांची निवड येत्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे.
राज्यमंत्री सत्तार-अंबादास दानवे यांची खेळी यशस्वी
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहा समर्थक सदस्यांना सोबत घेत भाजपच्या मदतीने बंडखोरी केली होती. अध्यक्षपदाला थोडक्यात अपयश आले. उपाध्यक्षपदी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे समर्थक शुभांगी काजे यांचा पराभव झाला. सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपला एक पद देत उर्वरित तीन पदे शिवसेनेने मिळवली. यात सत्तार समर्थक एक आणि जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे समर्थक दोघाला सभापतीपदे मिळाली आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी खैरे यांनी खडसावल्यामुळे बंडखोरी करणाऱ्या मोनाली राठोड यांना सभापतीपदाचे बक्षीस मिळाले, तर सत्तार यांचे खैरे यांच्याशी वाद झाल्यानंतरही त्यांच्या समर्थक सदस्याला महत्त्वाचे सभापती मिळविण्यात त्यांना यश आले. या निवडणुकीत राज्यमंत्री सत्तार व आ. दानवे यांची खेळी यशस्वी ठरल्याची चर्चा करण्यात येत होती. कन्नड, वैजापूर, पैठण तालुक्याला यावेळी कोणतेही पद मिळाले नाही.
काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला
काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीचा धर्म पाळला. मात्र, शिवसेनेने काँग्रेसला ऐनवेळी धोका दिला. अगोदरच असे करणार हे माहीत असते, तर आम्हालाही वेगळी भूमिका घेता आली असती. तरीही सभागृहात महाविकास आघाडीमध्ये फूट नको म्हणून शिवसेनेने दिलेल्या तिन्ही सभापतीपदांच्या उमेदवाराला काँग्रेसने मतदान केले. अशा पद्धतीने दिलेला धोका चुकीचा आहे. - श्रीराम महाजन, गटनेता, काँग्रेस, जि.प.
काँग्रेसने अवास्तव मागण्या केल्या
शिवसेनेने कोणताही धोका काँग्रेसला दिलेला नाही. काँग्रेसकडे संख्याबळ नसतानाही त्यांनी अवास्तव दोन सभापतीपदांची मागणी केली. त्यांना महिला व बालकल्याण हे सभापतीपद देण्याचा निर्णय शिवसेनेने केला होता. मात्र, त्यांना बांधकाम व वित्त आणि समाजकल्याण सभापतीपद हवे होते. ती मागणी शिवसेनेने मान्य केली नाही. तरीही शिवसेनेने महिला व बालकल्याण या सभापतीपदासाठी उमेदवार दिला नाही. काँग्रेसने देणे अपेक्षित होते. त्यामुळे त्याठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी झाला. शिवसेनेचा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची यातून भरपाई झाली आहे.
- आ. अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना