औरंगाबाद: उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे निवडणूक चिन्हं मिळाल्याने मंगळवारी शिवसेनेच्यावतीने क्रांतीचौकात फटाके फोडून , ढोल ताशाच्या गजरात आणि मशाल पेटवून जल्लोष केला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयजयकारही कार्यकर्त्यांनी केला.
शिवसेनेतील फुटीनंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठविण्याचा निर्णय घेतला. यानंतर आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवीन नावही दिले आणि मशाल हे निवडणूक चिन्ह दिले. हे निवडणूक चिन्हं अंधेरी निवडणूकीपुरत असले तरी शिवसेनेच्यावतीने मंगळवारी सकाळी क्रांतीचौकात मशाल चिन्हं मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मशाल पेटवून क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यानंतर पुतळ्याला प्रदर्शना करीत जल्लोष केला. ढोल, ताशे वाजवून तसेच फटाके फोडून कार्यकर्त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयघोष केला. या आंदोलनात माजी महापौर नंदू घोडेले, शिवसेनेचे मध्य विभाग शहर संघटक बाळासाहेब थोरात, पश्चिम विभाग संघटक बाळासाहेब गायकवाड, शिवसेना उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, गोपाल कुलकर्णी, संतोष खेंडके, सतीश कटकटे, संतोष जेजुरकर, जायभाये,विशाल गायके,नंदू लबडे,महिला आघाडीच्या शहर संघटक प्रतीभा जगताप, मीरा देशपांडे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.