औरंगाबाद : एप्रिल २०२० मध्ये महापालिकेची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेने चांगलीच कंबर कसली आहे. महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी सेनेने वॉर्डनिहाय गोपनीय सर्वेक्षण सुरू केले आहे. या सर्वेक्षणात उमेदवारांसंदर्भात चाचपणी, मतदारांचा कल कोणाकडे आहे, हे जाणून घेण्यात येणार आहे. या अहवालाच्या आधारावरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापालिकेत ११५ नगरसेवक निवडून येणार आहेत. बहुमतासाठी ५७ चा जादुई आकडा गाठणे आजपर्यंत कोणत्याच पक्षाला जमले नाही. महापालिकेच्या मागील सहा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजपने अपक्षांच्या कुबड्या घेऊनच सत्ता स्थापन केली आहे. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. सेनेचा पारंपरिक मित्रपक्ष दुरावला आहे. एक मित्र दूर गेला, तर दोन नवीन मित्रपक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी सेनेसोबत सत्ता स्थापन करताना येतील. निवडणुकीत हे दोन्ही पक्ष सोबत घ्यावेत का? यावर सेनेत दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. निवडणूक स्वबळावर लढवावी, निवडणुकीनंतर दोन्ही मित्रपक्षांना सोबत घ्यावे, असाही सूर सेनेतील काही मंडळी व्यक्त करीत आहेत. २०१५ मध्ये सेनेने ११३ पैकी ५९ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. यामध्ये सेनेचे २९ उमेदवार विजयी झाले होते.२०२० च्या मनपा निवडणुकीत वॉर्डरचना सेनेला पोषक ठरणारी आहे. त्यामुळे ७० वॉर्डांमध्ये निवडणूक लढविण्याचा विचार पक्षातील स्थानिक नेते करीत आहेत. स्वबळावर निवडणूक लढवायची म्हटले, तर मतदारांच्या पसंतीला उतरणारे उमेदवार द्यावे लागतील. काही वॉर्डांमध्ये पुन्हा पुन्हा तेच चेहरे नकोत, असेही पक्षात जोरदार मंथन सुरू आहे. तरुणाईला जास्तीत जास्त वाव द्यावा, अशी ‘मातोश्री’ची इच्छा आहे. या सर्व परिस्थितीत सेनेकडून शहरातील काही वॉर्डांमध्ये गोपनीय सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. या सर्वेक्षणात अनेक बाबी अत्यंत बारकाईने तपासण्यात येणार आहेत. सर्वेक्षणात पहिल्या क्रमांकावर असलेल्या उमेदवारांनाच पक्ष संधी देण्याची दाट शक्यता आहे.भाजपसोबत थेट मुकाबलाशहरातील ८० ते ९० टक्के वॉर्डांमध्ये सेनेला भाजपचा मुकाबला करावा लागणार आहे. त्यामुळे सेना यंदा निवडणुकीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. मागील निवडणुकीत भाजपने ५० उमेदवार उभे केले होते. त्यातील २३ निवडून आले. भाजपचा हा आलेख आणखी कमी कसा करता येईल, यादृष्टीने सेनेने वॉर्डरचना, आरक्षण सोडतीत जोर लावला होता.महाआघाडीत लढायचे झाल्यासनवी मुंबई महापालिकेसाठी महाआघाडीत निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. औरंगाबाद महापालिकेसाठी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्राथमिक स्तरावर चर्चेचे गुºहाळ सुरू आहे. महाआघाडीत लढायचे झाल्यास सेना ७०, तर दोन्ही मित्रपक्षांना ४५ जागा देण्यात येणार आहेत.