औरंगाबाद : राजाबाजार परिसरातील पेंटचे दुकान व वाहनांची जाळपोळ केल्याच्या आरोपाखाली अटकेतील नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संगीतराव एस. पाटील यांनी मंगळवारी (दि.१२) १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला.
मोहंमद शोएब अब्दुल मुनाफ (२८, रा. राजाबाजार) यांच्या तक्रारीवरून राजेंद्र जंजाळ यांच्याविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४७,१४८,१४९, ४३६,४३५ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल झाला होता. १५ मे रोजी त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली होती.
२१ मे रोजी सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी त्यांचा नियमित जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयास जंजाळ यांनी अॅड. राजेंद्र एस. देशमुख यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते. यावर सुनावणी झाली असता खंडपीठाने १५हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करीत तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करावे आणि साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटीचे पालन करण्यास सांगितले.