औरंगाबाद : शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना गंगापूर मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे प्रभारी जिल्हाप्रमुख म्हणून नंदकुमार घोडेले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षात जिल्हाप्रमुख बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहे. माजी आ. पवार यांना कन्नडमधून उमेदवारी देण्यात आल्यामुळे प्रभारी जिल्हाप्रमुखपद २००४ साली दानवे यांच्याकडे देण्यात आले. तशीच परिस्थिती आज निर्माण झाली आहे. सेनेच्या जिल्हाप्रमुखपदासाठी जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. राजू वैद्य आणि आ. जैस्वाल यांचे समर्थक राजेंद्र जंजाळ यांना त्या पदाची इच्छा आहे. हे पद कोणाच्या पदरी पडते यावरून सेनेमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ज्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, त्यांचा पदावर डोळा आहे. सेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात खा. चंद्रकांत खैरे म्हणाले की, दानवे गंगापूरमधून लढत आहेत. त्यामुळे टेन्शन गेले आहे. दरम्यान, खा. चंद्रकांत खैरे यांना या प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, पदाचा निर्णय लवकरच होईल. पदावर कुणाला बसवायचे याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही. मराठवाड्याची जबाबदारी असताना जिल्ह्यातील ९ जागांवर विशेष लक्ष ठेवणार असल्याचे खैरे यावेळी म्हणाले.
शिवसेना जिल्हाप्रमुख बदलाचे वारे जोरात
By admin | Published: September 29, 2014 12:19 AM