औरंगाबाद : युतीमधील शिवसेना आणि भाजपा यांनी आपली पहिली आदि जाहीर केली. दोन्ही याद्यांवर नजर टाकली असता औरंगाबाद जिल्ह्यात युतीमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे ६ तर भाजपाच्या वाट्याला केवळ ३ जागा आल्या आहेत.
मंगळवारी भाजपाने १२५ पहिली उमेदवार यादी जाहीर केली. यात मराठवाड्यातील १७ मतदारसंघात पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. जिल्ह्यात औरंगाबाद पूर्व - अतुल सावे, फुलंब्री - हरिभाऊ बागडे, गंगापूर - प्रशांत बंब अशा तीन मतदारसंघातील उमेदवार भाजपने जाहीर केले आहेत.
दुसरीकडे शिवसेनेने जिल्ह्यातील उमेदवारांना थेट एबी फॉर्म देत उमेदवारी पक्की केली आहे. यात सेनेसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या गेलेल्या औरंगाबाद मध्य मधून माजी आमदार प्रदीप जैस्वाल, औरंगाबाद पश्चिम- आ. संजय शिरसाठ, गंगापूर, कन्नड - उदयसिंग राजपूत, सिल्लोड- अब्दुल सत्तार, वैजापूर - रमेश बोरणारे आणि पैठण - संदीपान भुमरे असे ६ विधानसभा मतदासंघ शिवसेनेकडे आहेत. यामुळे जिल्ह्यात युतीमध्ये शिवसेनाच मोठा असल्याचे चित्र आहे.
२०१४ मध्ये दोघांचेही ३-३ आमदार औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ९ विधानसभा मतदारसंघ आहेत. स्वतंत्र लढताना २०१४ मध्ये यातील औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला तर औरंगाबाद पश्चिम, पैठण आणि कन्नड अशा तीन मतदारसंघात सेनेने भगवा फडकवला. औरंगाबाद मध्य- एमआयएम, सिल्लोड - कॉंग्रेस आणि वैजापूर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला होता.