औरंगाबाद: यापुढील काळात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीसह सर्व निवडणुका स्वबळावर लढून पुढे जाण्याचा सूर मंगळवारी शिवसेनेच्या औरंगाबादमधील स्थापनेच्या ३६ व्या वर्धापन दिनी आयोजित ऑनलाईन मेळाव्यात आळवण्यात आला.
पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले, शहरासाठी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु झाले आहे. शहरातील रस्त्यांची कामे होत आहेत. सफारी पार्क होत आहे. जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जात आहे. त्यामुळे यापुढे येणाऱ्या सर्व निवडणुकांत शिवसेना पुढे जाईल. आता कुठलीही चूक आपल्या हातून होता कामा नये.
शिवसेना ही चार अक्षरे जिवंत ठेवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. काही शिवसैनिक आज आपल्यात नाहीत. त्यांच्या त्यागामुळे शिवसेनेची अक्षरे सर्वत्र कोरली गेली आहेत, अशी भावना देसाई यांनी व्यक्त केली.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, पुढच्यावर्षी येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेनेने एकट्याच्या बळावर लढल्या पाहिजेत, असा संकल्प वर्धापनदिनी केला पाहिजे. जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांसह सर्व निवडणुका स्वबळावर लढल्या पाहिजेत.
जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे म्हणाले, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या ६० टक्के जागा आहेत. जिल्हा बँकही ताब्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना आगामी काळात सक्षमपणे पुढे जाईल.
पहिलाच व्हर्च्युअल मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला. यात रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ. मनीषा कायंदे यांच्यासह आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. रमेश बोरणारे आदींसह सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी सहभाग नोंदविला.