मनसे प्रमुख राज ठाकरे यांची आज औरंगाबादमध्ये सभा पार पडणार आहे. यात ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान, महाराष्ट्रानं अशा भरपूर सुपारी सभा पाहिल्या आहेत, असं म्हणत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बोचरी टीका केली. तसंच भोंगा कमळाला किती त्रास देतोय, ते आगामी काळात समजेल असंही ते म्हणाले.
"हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शहराला औरंगाबादपासून संभाजीनगर अशी एकप्रकारची मुक्तता दिली आहे. संभाजीनगरवासीय एकप्रकारे ती आठवण जतन करत आहेत. शिवसेनेचं येथील हिंदुत्वाचं जे नातं आहे ते अभेद्य आहे. ते पुढेही कायम राहिल यात शंका नाही," असं सुभाष देसाई म्हणाले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सुभाष देसाई औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केलं.
"कोणीही काही नवे कार्यक्रम घेतायत ते पाहावं लागेल. आधी मराठी मराठी केलं, आता भोंगा भोंगा आहे. आता भोंगा आणि कमळाचं नातं झालेलं आहे. भोंगा कमळाला किती त्रास देतं हे येणाऱ्या काळात कळेल. महाराष्ट्रानं अशा अनेक सुपारी सभा पाहिल्या आहेत. त्यामुळे हा विषय आणखी किती दिवस टिकेल हे पाहण्यास जनता आणि मी उत्सुक आहे," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आतापर्यंत सर्व संकटं आली त्यात पोलिसांनी प्रशासनानं चांगली कामगिरी बजावली आणि जनतेला संकटातून बाहेर येण्यास वेळोवेळी मदतही केली आहे. काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. त्याप्रमाणे त्यांनी काळजी घेतलीये. औरंगाबादच्या शांततेला कुठेही गालबोट लागणार नाही, जनता सुज्ञ आहे, कोणीही किती चिथावणी दिली तरी आपली डोकी भडकवून घेणार नाही, याची खात्री आहे. जे बंधुभावाचं नातं कायम ठेवलंय त्याचं जतन करायचं आहे. कोण काय करतं याकडे जनता चाणक्षपणे पाहत असल्याचंही देसाई म्हणाले.
औरंगाबाद शिवसेनेचा गड आहे आणि राहणार"बाबरी मशिद पाडल्यानंतर याची जबाबदारी कोणीही घ्यायला तयार नव्हते. भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सर्व घडत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की बाबरी मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे. बाबरी मशिद पाडण्याची जबाबदारी सर्वप्रथम शिवसेनेने घेतली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कोण आहे हे शिवसेनेला सांगायची गरज नाही. अगोदर शिवसेना आणि भाजप यांची युती होती. राज्यात लवकरच मनसे आणि भाजपची युती पाहण्यास मिळेल. भाजपने मनसेला सुपारी देऊन ही सभा आयोजित केली आहे, मात्र आशा सुपारी सभेचा शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही. औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा गड आहे आणि तो शिवसेनेचाच गड राहील यात तिळमात्र शंका नाही," असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.