औरंगाबाद : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेच्या विविध नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आपल्याच घरात उमेदवारी रहावी यासाठी प्रयत्न केले जात असून, किमान १५ जागा या नेत्यांना हव्या असल्याची माहिती समोर येत आहे. नेत्यांच्या या प्रयत्नांमुळे सेनेतील इच्छुक कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे.
घरातील सदस्याबरोबरच काहींनी निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीचे प्रयत्न सुरु केले आहेत. यामुळे शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, आणि पदाधिकाऱ्यांच्याच घरात अधिक जागा जातील, अशी चर्चा सध्या महापालिका वर्तुळात सुरू आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या घरात ३ जागा मिळाव्यात यासाठी तयारी सुरू आहे. यात चिरंजीव, पुतण्यासह अन्य एका कुटुंब सदस्याचा समावेश आहे. आ. प्रदीप जैस्वाल यांच्या घरातून मुलगा व नातलगातून एक, अशा दोघांना उमेदवारी हवी आहे. आ. संजय शिरसाट यांनाही मुलगा आणि अन्य एक अशा दोन जागा हव्या आहेत. चिरंजीव आणि कन्या निवडणुकीच्या रणांगणात ते आणतील, अशी चर्चा आहे.
सभागृह नेते विकास जैन यांना स्वत:ला आणि पत्नीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांना तीन जागा हव्या आहेत. चिरंजीव, पत्नी आणि स्वत:साठी उमेदवारी मिळविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे हे भावासाठी उमेदवारी मिळावी, या प्रयत्नात आहेत. राजू वैद्य हेही स्वत:सह आणखी एका समर्थकाला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्नशील आहेत. राजेंद्र जंजाळ स्वत:साठी किंवा पत्नीसाठी आणि त्र्यंबक तुपे हे स्वत:साठी पुन्हा उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निष्ठावान कायकर्ते तसेच विद्यमान नगरसेवकांपैकी काही जणांना स्वत:ला, आईला उमेदवारी आहे. तसेच पत्नी, पती आणि चिरंजीवालादेखील उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे. मनपातील एका ज्येष्ठ अभियंत्यांच्या भाच्याला उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनीही सेना नेत्यांमार्फत उमेदवारी मिळण्यासाठी हालचाली सुरू केल्याची चर्चा कानावर येत आहे.
इच्छुकांच्या गुपचूप बैठका; मात्र युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नाही शिवसेनेकडून सध्या इच्छुकांच्या गुपचूप बैठका सुरू असून, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्या बैठकीचे निमंत्रणही नसते. तसेच इतर पदाधिकाऱ्यांनादेखील इच्छुकांच्या बैठकीला निरोप दिला जात नाही, त्यांनाही नियमित बैठकीला बोलावले जात नाही. रचनेनंतर वॉर्डाची सीमा कुठून कुठपर्यंत आहे, याचीही माहिती अनेक इच्छुकांना नाही. त्यांना मात्र निरोप दिले जात आहेत, अशी ओरड सध्या सुरू आहे. बंडखोरी करणारे, पक्षकार्यात कोणतेही योगदान नसलेल्यांऐवजी निष्ठावानांना आतापासूनच डावलले जात आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ज्यांनी सतरंज्या उचलल्या, पक्षाचे काम केले, जे तरुणांचे युवक आणि युवकांचे प्रौढ झाले, त्यांचा विचार होण्याऐवजी नेत्यांच्या घरातच उमेदवारीच्या वाटाघाटी होत असतील तर कसे करायचे, यावर कार्यकर्ते चिंतन करू लागले आहेत.