शिवसेनेने हिंदुत्व सोडले, त्यांच्या भगव्या झेंड्याचे शुद्धीकरण गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 05:17 PM2020-11-19T17:17:08+5:302020-11-19T17:22:01+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना तिलांजली दिली
औरंगाबाद : शिवसेनेच्या भगव्या झेंड्याच्या शुध्दीकरणाची वेळ आली आहे. त्यांनी हिंदुत्व सोडून दिलेले आहे. त्यांची मनोधारणाच गोऱ्या लोकांच्या कामासारखी आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकांना यांनी तिलांजली दिली आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केली. शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या वकिलांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आ. आशिष शेलार यांनी यावेळी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. वीज बिल माफीच्या मुद्द्यावर त्यांनी कॉंग्रेसला टीकेचे लक्ष्य केले .त्यांनी सांगितले की, कॉंग्रेसला जनतेने तर झिडकारले आहेच त्यांना आता महाविकास आघाडीतही कुणी इज्जत देताना दिसत नाही, हे विज बिल माफ करण्याच्या मुद्दयावरून लक्षात येत आहे.
''स्वत:ची उंची बघूनच भाजपची उंची मोजा''; जयसिंगराव गायकवाडांना इशारा
शिरीष बोराळकर यांना पक्षाचे तिकीट मिळाल्यानंतर गायकवाड यांनी त्यांना आशीर्वाद द्यायला हवे होते. पक्षात नवीन पिढीला संधी मिळायलाच पाहिजे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला योग्य तो सन्मान ठेवू असे गायकवाड यांना सांगितले होते. जयसिंगराव गायकवाड यांना भाजपाने उंचीवर नेले. आता ते भाजपबद्दल बदनामीकारक वक्तव्य करीत आहेत. हे त्यांनी वेळीच थांबवले नाही तर आम्ही त्यांना त्यांच्यापेक्षाही भयानक भाषेत उत्तर देऊ. जयसिंगराव गायकवाड यांनी आधी स्वत:ची उंची बघावी मग भाजपची उंची मोजावी असा दम शेलार यांनी दिला.
सतीश चव्हाण यांच्यावर टीका
शिरीष बोराळकर हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. रमेश पोकळे यांनी समजून घ्यावे व भाजपचा उमेदवार हा प्रचार थांबवावा असा
इशारा शेलार यांनी पोकळे यांना दिला. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्यावर आशिष शेलार यांनी यावेळी टीकेची झोड उठवली. विधान परिषदेत त्यांनी कसलीही चमकदार कामगिरी बजावलेली नाही. शिक्षकांना न्याय दिलेला नाही. मराठा आरक्षणाच्या वेळी कुठे होते ? असे सवाल त्यांनी उपस्थित केले. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केणेकर, बापू घडामोडे, अनिल मकरिये आदींची उपस्थिती होती.