औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सुरेश बेदमुथा यांच्यावर सदस्याने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतानाच महापालिकेतील एका सेना पदाधिकाऱ्याने अतिक्रमण हटाव पथकातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शिवराळ भाषेत शिवीगाळ केली. त्यामुळे संबंधित अधिकारी दीर्घ वैद्यकीय रजेवर निघून गेले आहेत. या वागणुकीला सडेतोड उत्तर देण्यासाठी प्रशासनाने त्यांच्यावर सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. मात्र, सत्तेपुढे शहाणपण नको म्हणून प्रशासनाने आपल्या तलवारी म्यान केल्या.महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकातील अधिकारी व कर्मचारी सुपारी घेऊन काम करतात. श्रीमंतांचे अतिक्रमण अजिबात पाडत नाहीत. गरिबांची साधी लोखंडी टपरी दिसली तरी उचलून आणतात. असा खळबळजनक आरोप अलीकडेच सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने केला होता. मनपा आयुक्तांनी अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी नगररचना विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. आयुक्तांच्या सूचनेनुसार इमारत निरीक्षक व नगररचनामधील कर्मचारी काम करीत असताना नगरसेवकांनी प्रखर विरोध सुरू केला. आमच्या वॉर्डात अनधिकृत बांधकामाचे सर्वेक्षण केल्यास आम्ही तुमच्यावर पैसे मागितल्याचा आरोप आयुक्तांकडे करू, अशी धमकी काही नगरसेवकांनी दिली. मागील आठवड्यात अतिक्रमण हटाव पथकातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अनधिकृत बांधकाम थांबविले. ज्याठिकाणी बांधकाम सुरू होते, तेथील सामान जप्त करून अधिकारी निघाले. अचानक या वाहनासमोर मनपा पदाधिकाऱ्याचे वाहन आले. त्यांनी अतिक्रमण हटाव पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याला नागरिकांसमोर अर्वाच्च शिवीगाळ केली. सदस्यत्व रद्दची कारवाई अन्...गर्भगळीत झालेल्या अधिकाऱ्याने ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. वरिष्ठांनीही संबंधित पदाधिकाऱ्याने अतिक्रमण हटावच्या कारवाईत अडथळा निर्माण केला म्हणून सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली. नंतर प्रकरण अंगलट येईल म्हणून फाईल बंद करण्यात आली. अपमान सहन न झाल्याने संबंधित अधिकाऱ्याने दीर्घ वैद्यकीय रजेवर जाणे पसंत केले. महापालिकेत कोणताही अधिकारी आपल्या घरचे काम करीत नाही. त्याला एवढ्या खालच्या दर्जाची वागणूक देण्यात येत असेल तर काम कोणीच करणार नाही, अशी प्रतिक्रिया काही अधिकाऱ्यांनी नोंदविली.
मनपा पदाधिकाऱ्यांची शिवीगाळ; अधिकारी दीर्घ वैैद्यकीय रजेवर
By admin | Published: August 20, 2016 1:06 AM