औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १५ ते २० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. इच्छुकांच्या मुंबई वाºया वाढल्या असून, प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. जून २०१८ नंतर स्थायी समितीमध्ये अनेक अर्थपूर्ण प्रस्ताव येणार आहेत. त्यामुळे सभापतीपदावर अनेकांचा डोळा आहे. विद्यमान सभापती गजानन बारवाल यांनी स्थायी समिती सदस्य पदावर गेल्या महिन्यात प्रवेश मिळविल्यामुळे सेनेतील इच्छुकांचे देव पाण्यात आहेत.
सेनेत प्रवेश करून जर बारवाल पुन्हा सभापती झाले तर नातलग असलेले महापौर घोडेले-बारवाल यांचा वर्षभर पालिकेवर आर्थिक कंट्रोल राहील. रस्त्यांच्या, स्मार्ट सिटी कामाच्या निविदांमुळे बारवाल यांनी गेल्या महिन्यात स्वार्थापोटी पुन्हा स्थायी समितीत प्रवेश मिळविल्याचे बोलले जात आहे. बारवाल शिवसेनेत असताना त्यांना महापौर, सभागृह नेता, प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य, विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. एवढे सगळे मिळाल्यानंतरही ते सेनेच्या विरोधात मनपा निवडणुकीत अपक्ष लढले. निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक करून सभापतीपद पटकावले. भाजप व अपक्ष नगरसेवकांच्या आघाडीला नाराज करून ते पुन्हा स्थायी समितीत आल्यामुळे त्यांना टीकेचे धनी व्हावे लागले. असे असले तरी त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. सेनेत येताच त्यांना लगेच सभापती करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. किंबहुना त्यांचीही तशी इच्छा आहे. त्यांच्या प्रवेशाच्या हालचालींवरून शिवसेनेतील इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. तर भाजपमधील मंडळीही बारवाल यांना जवळ करीत नसल्याचे चित्र आहे. एकाच समाजातील व्यक्तीना दोन्ही पदे दिली गेली तर इतर समाजातील नगरसेवकांमध्ये नाराजी उफाळून येण्याची शक्यता व्यक्त झाल्यामुळे त्यामुळे शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैद्य, वाडकर, खैरे, शिरसाट यांची नावे चर्चेतविद्यानगरचे नगरसेवक राजू वैद्य, क्रांतीचौकच्या नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, समर्थनगरचे नगरसेवक ऋषिकेश खैरे, बन्सीलालनगरचे नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत. पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात वैद्य यांचा प्रभाव असल्यामुळे त्यांचे नाव पक्षपातळीवर आघाडीवर आहे. महिला नगरसेविका म्हणून संधी देण्याचे ठरले तर वाडकर यांचे नाव पुढे येईल. खा.चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश आणि आ.संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत यांची नावे चर्चेत असली तरी पक्षपातळीवर त्याबाबत निर्णय होईल.