औरंगाबाद: शिवसेनेचे बंडखोर आमदार तथा कॅबिनेट मंत्री संदीपान यांना लॉटरी लागली आहे. औरंगाबाद येथील म्हाडाच्या प्रकल्पात आमदार कोट्यातून त्यांना घर लागले आहे. विशेष म्हणजे, आमदार कोट्यातून घर मिळण्यासाठी अल्प उत्पन्न गटातून (एलआयजी) चिकलठाणा येथील म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकासाठी भुमरे यांनी अर्ज केला होता. राजकीय गदारोळात सेनेतील बंडखोरांच्या गटात असलेल्या भूमरेंचे नाव म्हाडाच्या लॉटरीत आल्याने सोशल मीडियात चर्चेला उधान आले आहे.
औरंगाबादमधील म्हाडाच्या चिकलाठाणा येथील घरासाठी आज ऑनलाईन सोडत जाहीर झाली. यात लाभार्थ्यांच्या यादीत राज्यातील राजकीय भूकंपात सामील असलेले कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचे नाव आले आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिंदे यांच्यासोबत भुमरे देखील गुवाहाटी येथे आहेत. याच भुमरे यांना अल्प उत्पन्न गटातील म्हाडाच्या प्रकल्पात आमदार कोट्यातून घर लागले आहे. आज जाहीर झालेल्या ऑनलाईन सोडतीत लाभार्थ्यांच्या यादीत त्यांचे फोटोसह नाव आले आहे. ही यादी सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. कॅबिनेट मंत्री असलेल्या भुमरे यांना अल्पउत्पन्न गटातील प्रकल्पात घर घेण्याचा मोह झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आमदार कोट्यातून लागली लॉटरीऔरंगाबाद येथीलं चिकलठाणा येथे म्हाडाचा बाराशे सदनिकांचा प्रकल्प आहे. यासाठी आज ऑनलाईन पध्दतीने सोडत घेण्यात आली. म्हाडातर्फे विविध गटांसह लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेचे विद्यमान आणि माजी सदस्यांसाठी दोन टक्के सदनिका राखीव ठेवण्यात येतात. या आम्दारांसाठीच्या राखीव कोट्यातून भुमरे यांना घर मिळाले आहे. मात्र, लाभार्थ्यांच्या नावे यापूर्वी घर नसावे अशी अट आहे. आता मंत्री भुमरे यांच्या नावे एकही घर नसेल का ? अशी शंका ज्यांचे सोडतीत नाव नाही असे उपस्थित करत आहेत.