दुपारी साडेतीननंतर शिवसैनिक जमत गेले. महिलांनी आधीच दोन गट करून दोन चुली पेटवल्या होत्या. गॅस सिलिंडरचे भाव वाढल्यामुळे आता स्वयंपाक चुलीवर करण्याची वेळ आली आहे, असा संदेश त्यांना द्यायचा होता. पुरुष कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी सुरू केली. अनेकांच्या हातात भगवे झेंडे होते व गळ्यात भगवे गमचे होते.
गॅस दरवाढ करून महिलांच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो,मोदी -शहा यांचा निषेध असो, इंधन दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा घोषणांनी क्रांती चौक परिसर दणाणून गेला होता.
अनेकांच्या हातात गॅस सिलिंडर दरवाढ लिहिलेले फलक होते. यावेळी आ. अंबादास दानवे व अनेकांनी महिलांनी थापलेल्या भाकरीची चव घेतच माध्यमांना प्रतिक्रिया दिली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत आंदोलन चालले. (जोड आहे)