सिल्लोड: सिल्लोड पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. भाजपचे २ सदस्य फुटल्याने ९ विरुद्ध ७ मताने शिवसेनेच्या सभापतीपदी कल्पना संजय जामकर यांची सभापतीपदी तर उपसभापती पदी काकासाहेब राकडे यांची निवड झाली. भाजपमधून शिवसेनेत आलेल्या दोन्ही सदस्यांना सभापती व उपसभापती निवड करण्याची खेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्याने भाजप कोंडीत सापडली आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीत सभापती पदासाठी भाजपतर्फे छायाबाई ज्ञानेश्वर उबाळे यांनी तर उपसभापती साठी अनिल खरात यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. तर शिवसेनेतर्फे सभापतीसाठी कल्पना संजय जामकर व उपसभापतीसाठी काकासाहेब राकडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. यानंतर दुपारी २ वाजता सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही पदाच्या उमेदवारांना प्रत्येकी ९ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला केवळ ७ मते मिळाली. सभापतीपदी कल्पना संजय जामकर,उपसभापती पदी काकासाहेब राकडे यांची निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्वाचन अधिकारी राजेश जोशी, सहायक निर्वाचन अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी केली. निवडणूक कामात गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांनी मदत केली
सत्तारांचा भाजपला धक्का अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री झाल्यानंतर भाजपच्या ताब्यात असलेली पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात घेऊन पहिला धक्का दिला आहे. भाजपचे सदस्य फोडून त्यांनाच सभापती व उपसभापती केल्याने भाजपची नाचक्की झाली आहे.