लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आचार्य नयनपद्म स्वामी यांच्या विरोधात शिवसेना खा. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खा. राऊत यांचा राजीनामा घ्यावा. तसेच राऊत यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे हे पक्षाकडून सांगण्यात यावे. मुनीश्रींच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत राऊत यांनी माफी मागितली तरच समाजाच्या संतप्त भावना शांत होतील. अन्यथा येथून मागे समाजाच्या भावना दुखावल्यानंतर जशी अवस्था एका भावाच्या पक्षाची (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांचे नाव न घेता) झाली, तीच अवस्था दुसºया भावाच्या पक्षाची (उद्धव ठाकरे, शिवसेनेचे नाव न घेता) होईल, असा इशारा सकल जैन समाजातर्फे गुरुवारी येथे झालेल्या बैठकीत देण्यात आला.शिवसेना खा.राऊत यांनी मीरा-भार्इंदर मनपा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आचार्य नयनपद्म स्वामींच्या विरोधात वक्तव्य केल्याने समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. खा. राऊत यांनी मुनीश्रींची तुलना ‘इसिस’शी संबंधाचा आरोप असलेल्या झाकीर नाईकशी केली. तसेच निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचे फतवे मुनींनी काढल्याने ते राजकीय गुंड असल्याची टीका राऊत यांनी केली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटण्यास सुरुवात झाली आहे.जाधवमंडीतील श्री विमलनाथ जैन मंदिरात सकल जैन समाजाची व्यापक बैठक झाली. बैठकीला सर्व स्तरातील समाजबांधवांनी हजेरी लावली. बैठकीमध्ये खा.राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात शुक्रवारी दुपारी १२ वा. जिल्हाधिकाºयांना भेटून निवेदन देण्याचे ठरले.पर्युषण मास समाप्तीनंतर खा.राऊत यांच्या वक्तव्या विरोधात मूक मोर्चा, धरणे आंदोलन, निदर्शने, सभा किंवा स्थानिक शिवसेना नेत्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. तसेच जे समाजबांधव शिवसेनेत काम करीत असतील त्यांनी तातडीने पदाचा राजीनामा देऊन बाहेर पडण्याचे आवाहनही यावेळी करण्यातआले.बैठकीला सकल मारवाडी समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम दरख, सकल जैन समाजाचे महासचिव महावीर पाटणी, उपाध्यक्ष प्रशांत देसरडा, खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी, तेरा पंथीय समाजाचे अध्यक्ष राजा डोसी, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष प्रकाश बाफना, खंडेलवाल जैन समाजाच्या अध्यक्षांसह ताराचंद बाफना, शांतीलाल संचेती, स्वरूपचंद भरंड, प्रकाश बाफना, विलास सावजी, ऋषभ कासलीवाल, विनोद बोकलिया, प्रवीण पारख, रवी लोढा, मनीषा भन्साली, सी.ए.रोहन आचलिया, अॅड.यतीन ठोले, पदमकुमार जैन, संतोष चोरडिया, मनोज बोरा आदींची उपस्थिती होती.
शिवसेना पक्षप्रमुखांनी राऊत यांचा राजीनामा घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:36 AM