औरंगाबाद: १९ फेब्रुवारी रोजीच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात चार दिवशीय 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे आज शिवसेना आमदार, पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही यावेळी शिवसेना आमदारांनी स्पष्ट केले. मात्र, क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण कधी होणार याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पालकमंत्री सुभाष देसाई अनावरणाची तारीख जाहीर करतील अशी माहिती त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा क्रांतीचौक येथे स्थापित झाला असून शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक १५, १६, १७ व १८ फेब्रुवारी रोजी शहरात 'शिवजागर' उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट ,महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश जैस्वाल, नितीन घोगरे काका यांनी सांगितले आहे. या उत्सवात शहरात भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शिवसेना कायम तिथी नुसार शिवजयंती साजरी करण्याच्या आग्रही मताची राहिली आहे. यामुळे शहरात तारखेनुसार शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर उत्सवाचे आयोजन केल्याने शिवसेनेने तिथीचा आग्रह बाजूला ठेवला का ? अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, जनभावना लक्षात घेता तिथी किंवा तारीख यापैकी एक काहीही ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
१५ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शिवजागरशिवसेना नेते पालकमंत्री सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या उत्सवास ध्वजारोहणाने १५ फेब्रुवारी रोजी क्रांती चौकात सुरुवात होणार आहे. १५ ते १७ फेब्रुवारी रोजी शहरातून तब्बल ३६ शिवमशाल एका रथावरून क्रांतीचौकात पोहोचणार आहेत. या शिवमशाल यात्रेचे नेतृत्व शिवसेनेचे सर्व उपशहर प्रमुख करतील ,त्याचप्रमाणे महिला आघाडी, दलित आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, वाहतूक आघाडी ,व्यापारी आघाडी स्वतंत्रपणे शिवमशाल यात्रा काढणार आहेत. दररोज सकाळी १० आणि सायंकाळी ४ वाजाता शहरातील नावाजलेले वाद्यवृंद मानवंदना देणार आहेत. तर या दरम्यान, रोज सायंकाळी ४ वाजात महाअभिषेक आणि छत्रपती शिवरायांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
असे असतील कार्यक्रम१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिवचरित्रावर आधारित वक्तृत्व स्पर्धा, १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी युवा शाहीर गणेश गलांडे आपली शाहीरी सादर करणार आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुप्रसिद्ध शिवचरित्राचे अभ्यासक प्रदीप साळुंके यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच दि.१८ तारखेला सकाळी १० वाजता मानवंदना व रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत १००० तरुण तरुणींचे पथक महामानवंदना देणार आहे. या उत्सवात शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, संतोष जेजुरकर, जयवंत ओक, अनिल पोलकर, विनायक पांडे, आनंद तांदुळवाडीकर, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, विधानसभा संघटक राजु वैद्य ,गोपाळ कुलकर्णी, सुशील खेडकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटिका सुनिता देव, समन्वयक कला ओझा, युवा सेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी केले आहे.