औरंगाबाद : पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्हा नियोजन समितीवर शिवसेनेच्या तीन नगरसेवकांची व एका शहरप्रमुखाची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. पालकमंत्र्यांचा गड या नियुक्त्यांमुळे आणखी मजबूत झाल्याची चर्चा असून, खा.चंद्रकांत खैरे विरुद्ध पालकमंत्री अशीच पक्षाची मोट बांधणी सध्या सुरू असल्याचे यातून दिसत आहे.
विशेष निमंत्रितपदी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये माजी महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह माजी सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, गजानन मनगटे व शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. यापैकी मनगटे यांना ९ महिन्यांतच सभागृह नेतेपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे त्यांना नियुक्ती दिली आहे. जंजाळ हे देखील अलीकडे अडगळीला पडले आहेत, तर तुपे यांचे महापौरपद गेल्यानंतर त्यांना प्रवाहात आणले आहे. थोरात यांच्यासह सर्वांचे एकप्रकारे पुनर्वसन केल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री जेव्हा जेव्हा शहरात येतात. तेव्हा त्यांच्या अवतीभोवती जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यासह एक विशिष्ट गट असतो. हा सगळा गट खा. खैरे विरोधातील असल्याची शिवसेनेत नेहमीच चर्चा होते. गेल्या महिन्यात पालकमंत्री शहरात येऊन गेले तरी खैरे गटातील एकाही पदाधिकार्यास ते आल्याची माहिती नव्हती. पालकमंत्री देखील त्यांच्या निधीतून करण्यात येणार्या कामांची पूर्ण माहिती व सद्य:स्थिती वरील मंडळींकडूनच जाणून घेतात. त्यामुळे पालकमंत्र्यांचा गट मजबूत होत असल्याची चर्चा आहे.