छत्रपती संभाजीनगर : अधिक श्रावणमासात सोमवारचे महत्त्व मोठे आहे. सर्वजण आसपासच्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेत असतात. मात्र, भगवान शिवशंकराचे मूर्ती रूपात तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे तेही सोबत पार्वती व गणराया... मग तुम्हाला शहराबाहेर दौलताबाद येथील अब्दीमंडी रस्त्यावर जावे लागेल. तिथे राधा मुकुंद युगल सरकार मंदिराच्या तळघरात शिवशंकर, पार्वती व त्यांच्या मांडीवर मध्यभागी बालगणेश असलेली मूर्तीचे दर्शन तुम्हाला होईल.
ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथपुरी मंदिराच्या वास्तुशिल्पावर आधारित हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराच्या खांबावरील सुरेख नक्षीकाम ओडिशातील कारागिरांनी केले आहे. या मंदिरावर एक नव्हे तर तीन कळस आहेत, तर गाभाऱ्यातील कळस जमिनीपासून ५५ फूट उंच आहे. मध्य भागातील कळस जमिनीपासून ३५ फूट उंच, तर पहिले सभामंडपाचा कळस २५ फूट उंच आहे. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राजस्थान येथील मकराना या पांढऱ्या संगमरवरापासून बनवलेली राधा-कृष्णाची मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे.
तर तळ मजल्यात शिवपार्वती गणेश विराजमान आहे. येथे शिवपिंड नव्हे तर महादेवाची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. ६५ बाय ४० फुटाचा हॉल आहे. यात या भगवंतांच्या मूर्तीचे दर्शन घडते. या पांढऱ्याशुभ्र मार्बलच्या मूर्तीही आहेत. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे शिवशंकर व पार्वतीच्या मांडीवर बालगणेश विराजमान झाले आहेत. मूर्ती ४ फुटाची आहे. भगवंतांसमोरच नंदीही असून, तोही संगमरवराचा आहे. मूर्तीरूपातील भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी भाविक या मंदिरात येत आहेत.
आध्यात्मिक पर्यटनाचे ठिकाणदौलताबादसारख्या निसर्गरम्य परिसरात मुख्य रस्त्यालगतच राधा मुकुंद युगल सरकार मंदिर दिसून येते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान विष्णू अवतार शिल्पातून साकारण्यात आला आहे. या शिवाय नवग्रहाचे दर्शनही होते. पुरुषोत्तम मासानिमित्त भगवान विष्णूच्या विविध अवतराचे दर्शन येथे होत आहे. एका आध्यात्मिक पर्यटनाचे ठिकाण म्हणून हे मंदिर परिसर विकसित होत असल्याची माहिती, सीए नंदकिशोर मालपाणी यांनी दिली.