औरंगाबाद : शिवस्वराज्य बहुजन पक्ष येणाºया विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार निवडणुक मैदानात उतरविणार असल्याचे सोमवारी पक्षाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जाधव यांनी २ लाख ८३ हजार मते घेतली. त्यांची ही मते ‘किंगमेकर’ठरली. गंगापूर-खुलताबाद, कन्नड, वैजापूर व पश्चिम मतदारसंघातून त्यांना चांगली मते मिळाली. पूर्व आणि मध्य मतदारसंघात अपेक्षित मते मिळाली नसली तरी चांगला उमेदवार मिळाल्यास ते मतदारसंघ देखील आपल्या ताब्यात येतीलच, या सहापैकी ४ मतदारसंघात पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा दावा जाधव यांनी केला.
शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँगे्रस व काँग्रेस या पक्षाचे पर्याय समोर आले. परंतु कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्या संपर्कातून घेतला आहे. सर्व पक्षातील वरिष्ठांशी आमचे पदाधिकारी चर्चा करीत होते, परंतु पक्ष स्थापन केल्यामुळे स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेत पंतप्रधान कोण व्हावे, यासाठी भाजपाला पाठींब्याची भूमिका होती. विधानसभेत विजय मिळाल्यास मुख्यमंत्री कोण व्हावा, माझ्या विजयी उमेदवारांच्या मतदारसंघातील विकासकामांना मदत करण्याचे जे कुणी आश्वासन देतील, त्यांना माझ्या पक्षाचा पाठींबा असेल.
शिवस्वराज्य बहुजन पक्षाला निवडणुक आयोगाची मान्यता मिळण्यात ‘शिव’ या शब्दाची अडचण आहे. पक्षाचे विधीज्ञ आयोगाकडे पाठपुरावा करीत असून लवकरच पक्ष आणि निशाणी संदर्भात निर्णय होईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले. सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेला त्यांच्या पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांची, समर्थकांची उपस्थिती होती.
खैरेंची ताकद आता संपलीमाजी खा.चंद्रकांत खैरे लोकसभेला निवडून आले असते, परंतु त्यांनी हिंदु-मुस्लिम अशी तेढ निर्माण करण्यासाठी आ.राजाभैय्या यांची सभा घेतली, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. आता त्यांची ताकद संपली आहे. मी स्वत: कन्नडमधून लढणार आहे. खैरे मला जेवढा विरोध करतील, तेवढ्या ताकदीने मी पुढे जाईल, असे जाधव म्हणाले. तसेच सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून मला काहीही अपेक्षा नाहीत. त्यांच्या मतदारसंघातील तीन जागांवर उमेदवार सध्या तरी देणार नाही,भविष्यात त्याबाबत विचार करू.