छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील बंद पडलेले भुयारी मार्गाचे काम अखेर बुधवारपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. येथील चौक आणि रस्ता सुरक्षित ठेवूनच हा भुयारी मार्ग केला जाणार असल्याचे बांधकाम विभागाने नागरिकांना सांगितले. त्यामुळे व्यावसायिक, नागरिकांनी एकच आनंद व्यक्त केला.
शिवाजीनगर रेल्वे गेटवर भुयारी मार्गात येथील चौक जाणार असल्याने ८० फुटांच्या रस्त्यावरील वाहतूक १५ फुटांच्या रस्त्यावर वळविण्याचे नियोजन करण्यात आले. याला नागरिकांनी विरोध करीत गत आठवड्यात भुयारी मार्गाचे कामच बंद पाडले. भुयारी मार्गात चौक जाणार असल्याने या रस्त्याचा काय उपयोग होणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने २३ मार्च रोजी ‘शिवाजीनगर भुयारी मार्गाचे अखेर त्रांगडेच’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. अखेर बुधवारपासून पुन्हा कामाला सुरुवात झाली. यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
नागरिकांची मागणी पूर्णभुयारी मार्गाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. चौक आहे तसा ठेवूनच हे काम केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ‘लोकमत’ने हा मुद्दा मांडल्याने नागरिकांची मागणी पूर्ण झाली.- तुकाराम जाधव
वृत्ताची दखल‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेण्यात आली आणि चौक सुरक्षित ठेवूून कामाला सुरुवात करण्यात आली. चौक तसाच राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.- रवींद्र पवार