छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी भुयारी मार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली. शुक्रवारी १५ मालमत्ताधारकांनी स्वत:हून मालमत्ता काढून घेण्यास सुरुवात केली. काही मालमत्ता मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने काढून दिल्या. सायंकाळपर्यंत ८० टक्के जागा माेकळी करण्यात आली. भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वेतर्फे निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी गट नंबर १२४/२ व १३१ मधील मालमत्तांचे भूसंपादन करण्यात आले. विशेष भूसंपादन कार्यालयाने ६ कोटी ९७ लाख रुपयांचा मोबदला मालमत्ताधारकांना दिला. त्यानंतर मालमत्तांवर मार्किंग करून देण्यात आली. जागेचा ताबा घेण्यासाठी मनपाने प्रक्रिया सुरू केली. शुक्रवारी सकाळपासूनच बांधकामे काढून घेण्यासाठी अतिक्रमण हटाव पथकाला पाठविले. देवळाई चौकातून रेल्वे गेटकडे येणाऱ्या मार्गाच्या डाव्या बाजूने असलेली बांधकामे काढण्यात आली. विशेष भूसंपादन अधिकारी विश्वनाथ दहे यांच्या उपस्थितीत ताबा देण्यात आला. भुयारी मार्गासाठी रेल्वेचा भाग वगळून इतर भागासाठी सा. बां. विभागामार्फत निविदा काढण्यात येणार आहे. रेल्वेकडूनदेखील स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे. रेल्वेगेट भुयारी मार्गाच्या डिझाईनला मंजुरी देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी सुटणारशिवाजीनगर रेल्वेगेटवर अनेकदा वाहतूक ठप्प होत असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रेल्वेमुळे वारंवार गेट बंद होत असल्याने अर्धा ते पाऊण तास दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. रुग्णवाहिका जाण्यासाठीदेखील रस्ता मिळत नाही. पावसाळ्यात तर प्रचंड हाल होतात. भुयारी मार्गामुळे नागरिकांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका होणार आहे.