लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली असून पाच वॉर्डांचा सर्वात मोठा प्रभाग असलेल्या सिडको प्रभागात २९ हजार ३०४ मतदार तर त्याखालोखाल गुरुद्वारा प्रभागात २३ हजार ९८६ मतदार आहेत. महापालिकेच्या २० प्रभागांत ३ लाख ९६ हजार ८३२ मतदार महापालिकेतील सत्ताधारी ठरवणार आहेत.महापालिका निवडणुकीसाठी नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या १ जुलै २०१७ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार यादीवरुन नांदेड-वाघाळा शहर महापालिकेच्या प्रभाग १ ते २० च्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. १९ आॅगस्ट रोजी महापालिकेने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. या यादीवर आक्षेप, सूचना, हरकती नोंदवण्यासाठी २८ आॅगस्टची मुदत दिली होती. या मुदतीत महापालिकेकडे ६५ आक्षेप प्राप्त झाले होते. या आक्षेपाच्या सुनावणीनंतर अंतिम मतदार आज शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.ही यादी शहरातील चारही क्षेत्रीय कार्यालयामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तरोडा क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग १ ते ३ पर्यंतची मतदार यादी पहावयास मिळेल तर शिवाजीनगर क्षेत्रीय कार्यालयात ४ ते १०, इतवारा क्षेत्रीय कार्यालयात ११ ते १८ आणि सिडको क्षेत्रीय कार्यालयात १९ व २० क्रमांकाच्या प्रभागाची मतदारयादी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. महापालिकेच्या २० प्रभागांसाठी ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार आहेत. त्यात २ लाख ६ हजार ४२१ पुरुष मतदार तर १ लाख ९० हजार ४०८ महिला मतदार आहेत. इतर मतदारांची संख्याही ४३ आहे. त्यात शिवाजीनगरात ३३ मतदार आहेत. महापालिकेच्या २० प्रभागांत सर्वात मोठा प्रभाग हा सिडको प्रभाग आहे. येथे ५ वॉर्डांचा प्रभाग करण्यात आला आहे. इतर सर्व प्रभाग ४ वॉर्डांचे आहेत. सिडको प्रभागात २९ हजार ३०४ मतदार आहेत. ४ वॉर्डांचा एक प्रभाग असलेल्या १९ प्रभागामध्ये सर्वाधिक २३ हजार ९८६ मतदार गुरुद्वारा प्रभागात आहे. शिवाजीनगर प्रभागात २२ हजार ७६८, होळी प्रभागात २२ हजार ४७८, खडकपुरा/ देगाव चाळ प्रभागात २१ हजार ६१५ मतदार आहेत.
सिडकोसह शिवाजीनगरमध्ये होणार दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 12:24 AM