दीडपट पुरवठ्यास परवानगी : रोज ३३०० जणांचे पोट भरते बाकीच्यांचे काय
विकास राऊत
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या पोटाला आधार म्हणून देण्यात येत असलेल्या शिवभोजन थाळीचा पुरवठा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील बहुतांश केंद्रांवर कमी-अधिक थाळ्यांचा पुरवठा हाेत असल्यामुळे १० ते २० जणांना थाळीविना परत जावे लागत आहे. रांगेत उभे राहूनही काही जणांना थाळी मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ येत आहे. या सगळ्या परिस्थितीवर कोटा वाढविण्याचा निर्णय जिल्हा पुरवठा विभागाने घेतला आहे.
शहरात एकूण ११ शिवभोजन केंद्रे आहेत. ग्रामीण भागात १३ केंद्रे आहेत. शहरात १६०० थाळ्यांना, तर ग्रामीण भागात १७०० थाळ्यांचा पुरवठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकूण ३३०० थाळ्या रोज वाटप हाेत असल्याचा दावा पुरवठा विभागाने केला आहे. आजवर सव्वातीन लाख थाळ्यांचे वाटप झाले आहे.
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन केंद्रे
२४
ग्रामीण भागातील केंद्रे
१३
शहरातील एकूण केंद्रे
११
शहरातील लाभार्थी संख्या
११००
रोजच्या थाळ्यांची लाभार्थी संख्या
३३००
दररोज १० ते २० जणांना मिळत नाही थाळी
शहरातील शिवभोजन केंद्रांवर कुठे जास्त, तर कुठे कमी थाळ्या मिळण्याची परिस्थती आहे. काही ठिकाणी लाभार्थी रांगेत उभे राहूनही त्यांना भोजन मिळत नाही, त्यांना उपाशी परतावे लागते. यावर काय उपाययोजना करता येईल याबाबत सहायक पुरवठा अधिकारी दत्ता बारस्कर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, इष्टांक (थाळ्यांचा आकडा) दीडपट केला आहे. जिल्ह्याला २ लाखांची मर्यादा आहे. पुरवठा संख्या वाढली तरी शासनाकडून मंजुरी घेऊन अनुदान देण्यात येईल. एक-दोन ठिकाणी कमी पडण्याचे प्रमाण आहे; परंतु रांगेतील प्रत्येकाला थाळी द्यावीच लागेल, अशी सूचना केंद्र चालकांना करण्यात आली आहे.
(डमी ९६९)
बसस्थानक : बसस्थानकावर गर्दी वाढत असल्याने शिवभोजन केंद्रावर थाळ्या कमी पडतात. रांगेत राहूनही ७ ते ८ जणांना थाळी मिळत नाही.
घाटी : येथील केंद्रावर थाळ्या कमी पडल्या तरी तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात येते. घाटी असल्यामुळे येथे दिवसभर ही सेवा सुरू असते.
रेल्वेस्टेशन : रेल्वेस्टेशन येथे शासनाने ठरवून दिलेल्या कोट्याच्या पुढे थाळ्यांचे वाटप होते. कमी पडण्यासारखी परिस्थिती येथे निर्माण होत नाही.