औरंगाबाद: माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून प्रवाशी घेऊन शहरात दाखल होत असलेल्या एस.टी. महामंडळाच्या शिवनेरी बसमध्ये बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच खळबळ उडाली. छावणीतील लोखंडी पुलावर बस अडवून कर्णपुरा येथील मैदानावर नेण्यात आली. बॉम्ब शोधक आणि नाशक(बीडीडीएस)पथकाने बसमधील प्रत्येक प्रवाशांसह बसची कसून तपासणी केली तेव्हा बॉम्बची अफवाच असल्याचे निष्पन्न झाले आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी कृषीमंत्री शरद पवार हे एका कार्यक्रमानिमित्त शहरात आलेले असताना पुण्याहून शहरात दाखल होत असलेल्या शिवनेरी बसमध्ये (क्रमांक एमएच-्र६ एस ९३८७)बॉम्ब असल्याचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला ३ वाजेच्या सुमारास प्राप्त झाला. या कॉलची माहिती पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि बीडीडीएस पथकाला देण्यात आली. छावणी पोलीस, वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी-कर्मचार्यांनी छावणीतील लोखंडी पुलावर शिवनेरी बस अडविली आणि बसचालकास गाडी थेट कर्णपुरा येथील मोकळ्या जागेत उभी करण्याचे सांगितले. यानंतर पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने बसला घेराव घातला.
प्रथम सर्व प्रवाशांना बसमूधन उतरून त्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर बीडीडीएसचा स्फोटक शोधक श्वान आणि मेटल डिटेक्टरने बसची कसून तपासणी करण्यात आली. प्रवाशांचे सर्व सामान आणि पार्सलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत बसमध्ये कोणतीही आक्षेपार्ह आणि संशयास्पद वस्तू न आढळल्याने सर्वांनी सुटकेचा सुसकारा सोडला. कुणीतरी खोडसाळपणाने पोलिसांना हा कॉल केल्याचे निष्पन्न झाले.
बसस्थानकावरील बसेसची तपासणी
कर्णपुरा येथे बसच्या तपासणीत काहीही नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बीडीडीएसच्या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक येथे जाऊन अन्य शिवनेरी आणि अश्वमेध बसेसची तपासणी सुरू केली. शिवाय साध्या वेशातील अधिकारी बसस्थानकावरील संशयास्पद वस्तू आणि व्यक्तींवर नजर ठेवून होते.
पोलीस उपयुक्त डॉ. दिपाली धाटे- घाडगे यांनी या विषयी सांगितले कि, पोलीस नियंत्रण कक्षाला अनोळखी व्यक्तीने कॉल करून आम्ही शिवनेरी बस मध्ये बॉम्ब ठेवला आहे असे कळवले. या कॉलची गंभीर दखल घेऊन तपासणी केली असता त्यात तथ्य आढळले नाही.
गुन्हा दाखल होणार पोलिसांना निनावी कॉल करून खोटी माहिती देणा-याचा आम्ही शोध सुरु केला, त्याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात येत आहे.