बीड : क्षीरसागरांच्या हाती रिमोट असलेल्या येथील पालिकेच्या राजकारणात शिवसंग्रामने पहिल्यांदाच उडी घेतली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चातून आ. विनायक मेटे हे पालिकेविरुद्ध रणशिंग फुंकत आहेत.पालिका शहराच्या मूलभूत विकासात कमी पडल्याचा आरोप करून शिवसंग्रामने बरखास्तीची मागणी लावून धरली आहे. शहर सुंदर व स्वच्छ करण्याच्या वलग्ना हवेत विरल्याचा दावा करत शिवसंग्रामने पालिकेचे राजकारण तापवले आहे. पालिकेत रिपाइंची एक सदस्या वगळता क्षीरसागरांची एकहाती सत्ता आहे. निवडणुका वर्षभरावर आलेल्या असतानाच आ. मेटे यांनी मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. उल्लेखनीय म्हणजे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या वळचणीला असलेल्या काही आजी- माजी नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचलेले आहे. मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष दिलीप गोरे, सुहास पाटील, मनोज जाधव यांनी केले. (प्रतिनिधी)
पालिकेविरुद्ध शिवसंग्रामचे रणशिंग
By admin | Published: November 02, 2015 12:02 AM