औरंगाबाद: दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. सर्वांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली आहे. यामुळे राज्यभरात ठाकरे गटामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावर औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आनंद व्यक्त केला. 'न्यायपालिकेचे धन्यवाद, त्यांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांचा मान राखला आणि न्याय दिला,' अशा शब्दात खैरेंनी आनंद व्यक्त केला.
'अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला'न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना खैरे म्हणाले की, 'शिवसेनेने शिवतीर्थासाठी पहिला अर्ज दिला होता, तेव्हाच त्यांनी मान्य करायला हवा होता. सत्ताधाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव टाकला होता. मला एका आधिकाऱ्याने सांगितले की, रोज मंत्रालयातून फोन यायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोज आयुक्तांना फोन करायचे आणि परवानगी देऊ नका, असे सांगायचे. ही मराठी माणसांची-हिंदूंची शिवसेना आहे. शिवसैनिकांना आणि उद्धव साहेबांना अजून किती त्रास देणार? शिवसेनेला त्रास देण्याचे काम शिंदे गटाने केले, देव त्यांना कधीच माफ करणार नाही,' असं खैरे म्हणाले.