Chandrakant Khaire ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीतील सलग दुसऱ्या पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे हे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास मी छत्रपती संभाजीनगर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा नुकतीच खैरे यांनी केली. या मतदारसंघातील विद्यमान आमदाराने पक्षासोबत गद्दारी केल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी मला निवडणूक लढवायची आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वादही उफाळणार!
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेतील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या दोन नेत्यांमधील संघर्ष नवा नाही. लोकसभेच्या तिकिटावरूनही या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष रंगला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपावरूनही हे दोन नेते आमने-सामने येण्याची शक्यता आहे. कारण छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघात काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे यांनी भाजपच्या राजू शिंदे यांना पक्षात घेतलं आहे. दानवे यांच्याकडून या मतदारसंघासाठी आगामी निवडणुकीत राजू शिंदे यांचेच नाव सुचवले जाण्याची शक्यता आहे. असं असताना आता खैरे यांनीही इथून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने पुन्हा एकदा खैरे-दानवे संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, "गद्दारी करणाऱ्या आमदाराला पाडायचं असेल तर समोर निष्ठावान उमेदवारच हवा. बाहेरच्या पक्षातून आलेल्या उमेदवाराला लोक साथ देणार नाहीत," असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी आतापासूनच राजू शिंदे यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
शिंदे यांचा पक्षप्रवेश
छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी भाजप आणि महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्ह्यातील मोठे नेते, माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित केलेल्या शिवसंकल्प मेळाव्यात राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजू शिंदे यांनी हातात शिवबंधन बांधले. यावेळी राजू शिंदेंसोबत १८ जणांनी भाजपला रामराम करत ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला होता.