सुनील कच्छवे , औरंगाबादमहानगरपालिका निवडणुकीनंतर ऐरणीवर आलेल्या शिवसेनेच्या स्थानिक कार्यकारिणीतील फेरबदलांचा विषय तूर्तास मागे पडला आहे. सेनेच्या स्थानिक कार्यकारिणीत काही बदल होणार हे निश्चित असले तरी सध्या त्याला हात घातला जाणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला; पण तरीही पक्षाला अपेक्षित असे यश मिळविता आले नाही. त्यामुळे निवडणूक निकालानंतर पक्षातील खांदेपालटाचा विषय पुढे आला होता. महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल यांच्यासह अनेकांच्या पदांवर गंडांतर येऊन नवीन लोकांना संधी मिळेल, असे संकेत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दिले जात होते. दुसरीकडे निवडणुकीच्या काळात पक्षाच्या अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली होती. बंडखोरीमुळे त्याचवेळी काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळेही कार्यकारिणीतील काही पदे रिक्त झाली आहेत. तसेच पक्ष कार्यकारिणीतील काही जण नगरसेवक म्हणून निवडून आले. एक व्यक्ती एक पद या संकेतानुसार त्यांचीही पक्ष कार्यकारिणीतून गच्छंती होईल, असे सांगण्यात येत होते. यामध्ये सेनेचे शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, उपजिल्हाप्रमुख नंदकुमार घोडेले, उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, महिला आघाडीच्या सुनीता आऊलवार यांच्यासह इतरही काही जणांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महिनाभरापूर्वी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. त्यात इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मात्र आता महिना उलटल्यानंतरही त्यावर कुठलाच निर्णय झाला नाही. लोकमतने या निवडणुकीनंतर सेनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळाले होते. ४सध्या हे बदल लांबणीवर पडले असले तरी भविष्यात आधी शहरप्रमुखपदापर्यंत आणि नंतर त्यापेक्षा वरिष्ठ पदाचे बदल होतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. स्थानिक कार्यकारिणीत बदल होणे अपेक्षित आहे. तसा विचारही झालेला आहे; पण त्याबाबत ठोस घडलेले नाही. इतक्यात हे बदल होतील, असे सध्या तरी म्हणता येणार नाही. -विनोद घोसाळकर, संपर्कप्रमुख
शिवसेनेतील फेरबदल लांबणीवर
By admin | Published: August 11, 2015 12:45 AM