छत्रपती संभाजीनगर : मध्यवर्ती बसस्थानकातुन नाशिककडे जाणाऱ्या शिवशाही बसचा कंटेनरसोबत भिषण अपघात झाला. त्यात जिवीतहानी झाली नाही, मात्र १३ प्रवाशी जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास महावीर चौकात घडली. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्रांतीचौक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक बस डेपोची शिवाशाही बस (एमएच ०९ ईएम १२९७) शुक्रवारी पहाटे चार वाजता मध्यवर्ती बसस्थानकातून नाशिकडे जाण्यासाठी निघाली होती. चालकाने मिल कॉर्नर चौकातून वळण घेऊन महावीर चौकाच्या दिशेने निघाला. बस महावीर चौकात पोहचल्यानंतर त्याचवेळी छावणीकडून आलेला कंटेनर (एमएच ४० सीएम ०६१३ ) जालन्याकडे जात होता. कर्णपुऱ्याकडे जाणाऱ्या बसचा वेग अधिक असल्याने कंटेनरवर धडकेपर्यंत वेग नियंत्रणात आला नाही. बस थेट कंटनेरच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक जोरात असल्याने बसमधील प्रवाशांना मोठा धक्का बसला. अनेकजण वर आदळून जखमी झाले. यात चालक व वाहक गंभीर जखमी झाल्याचे क्रांतीचौक पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र होळकर, सहायक निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना घाटी रुग्णालयात दाखल केले.
अपघातात हे प्रवाशी जखमीविद्या राहुल परदेशी (२६), राहुल उदय परदेशी (३५, दोघे रा. कळंब, जि. धाराशिव) शिंदुबाई निवृत्ती डोंगरे, निवृत्ती महादेव डोंगरे (७५), धोंडाबाई गायकवाड (७५, तिघे रा.येवला) , अशोक अहिरे (५४), शिवशाही बस चालक जगनसिंग झाला (५२), बेबी बाळासाहेब बुरबडे (४०), निर्मला मधुकर दिघे (५५), पांडुरंग गणपत गाडेकर (८३) , मिरा अशोक शिंदे (५७), लता बाळु खांडभले (५५, सर्व रा. नाशिक) आणि शरद एकनाथ राजगुरू (४४, रा. छत्रपती संभाजीनगर) अशी जखमींची नावे आहेत.