औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार हे गाव एकेकाळी हातभट्टीच्या दारूसाठी कुप्रसिद्ध होते. मात्र, येथील ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारून गावाची प्रतिमा अल्पावधीतच बदलली आहे. ग्रामस्थांनी चंग बांधत २०१७ साली येथे शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले आणि गावात आमुलाग्र बदल होते गेले. आता गाव व्यसनमुक्त होत असून गावाची ओळख शिवाजी महाराजांचे मंदिर असलेले गाव अशी झाल्याने ग्रामस्थांचा उर भरून येत आहे.
पंचक्रोशीत सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार गाव हातभट्टी दारू विक्रेचे ठिकाण म्हणून हे गाव कुप्रसिध्द होते. ही प्रतिमा कायमची पुसली जावी म्हणून गावातील तरुणांनी लोकसहभागातून २०१७ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे या भव्य मंदिर उभारले. छत्रपती शिवरायांचा आदर्श, त्यांच्या विचारांची जोपासना व्हावी, असा या मंदिर उभारणीमागील हेतू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या मंदिरामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जळकीबाजार गावाची ओळख शिवतीर्थ अशी झाली आहे.
ग्रामस्थांनी केले आमुलाग्र बदलजळकी बाजार येथील स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील पहिले शिवमंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळी विधिवत पूजाअर्चा व आरती केली जातेय. गेली पाच वर्षे या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. शिवरायांचे विचार मनामनात बिंबविण्याचे कार्य सुरु येथे सुरु आहे. यातूनच गाव दारू मुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी मंदिराच्या माध्यमातून गावातील व्यसनी व्यक्तीचा शोध घेत त्यांना व्यसन कायमचे सोडण्यासाठी प्रेरित केले. व्यसनी नागरिकाचे गाव असलेली ओळख मिटविण्यासाठी युवा वर्ग पुढे येऊन व्यसनमुक्तीचा संकल्प करीत असल्याचे चित्र आता गावात दिसून येत आहे. प्रत्येक ग्रामस्थ आपल्या राजाच्या स्वप्नातील गाव निर्माण करण्यासाठी जीवाचे रान करायला लागला आहे.
ग्रंथालय, मुलींच्या कन्यादानासह अनेक उपक्रममंदिराच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. येथे गावातील विद्यार्थ्यासाठी वाचनालय सुरु करण्यात आले आहे. स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठीही याठिकाणी पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मंदिर समितीच्या माध्यमातुन दरवर्षी सहा मुलींचे कन्यादान करण्यात येते. शासकीय योजनांबाबत जनजागृती व्हावी,यासाठी व्यापक प्रयत्न मंदिर समितीच्यावतीने केले जातात. तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य वाटप ,दिनदर्शिका प्रकाशन अशा अनेक उपक्रमांचे आयोजन मंदिर समितीमार्फत केले जाते. यामुळे आता गावाने कात टाकली असून जुनी ओळख पुसत शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालत एक नवा आदर्श निर्माण केला आहे.