औरंगाबाद : नक्षत्रवाडी परिसरात वीजचोरी करणाऱ्या ५४ ग्राहकांवर महावितरणने गुरुवारी धडक कारवाई केली. या ग्राहकांना दंड आकारण्याची प्रक्रिया सुरू असून, तो न भरल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती छावणी उपविभागाचे प्रभारी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश चव्हाण यांनी दिली.
औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गिते यांच्या आदेशानुसार मराठवाड्यात महावितरणने वीजचोरांविरुद्ध मोहीम सुरू केली. त्यानुसार औरंगाबाद परिमंडळाचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता बिभीषण निर्मळ, शहर-१ विभागाचे कार्यकारी अभियंता प्रेमसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सहा अभियंते व २४ तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पथकाने नक्षत्रवाडी शाखेअंतर्गत ही कारवाई केली.
आकडे, मीटरमध्ये छेडछाड
इटखेडा, वैतागवाडी, गौतमनगर, काश्मीरनगर, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, विजयनगर, हिंदुस्तान आवास या भागात काही नागरिक तारांवर आकडे टाकून आणि मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. आकडेबहाद्दरांनी तारांवर टाकलेले सर्व्हिस वायर तसेच फेरफार केलेले मीटर महावितरणने जप्त केले. वीजचोरी पकडण्यासोबतच थकबाकीदारांकडून ७० हजार रुपयांची वसुलीही या मोहिमेत करण्यात आली.